spot_img

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेहरूनगर झोनमध्ये ‘जनसंवाद’

 

नागपूर, ता. १८ :नेहरूनगर झोनमध्ये ‘जनसंवाद’ कार्यक्रमात सोमवारी (ता.१८) पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशित केले. नेहरूनगर झोनमधील दत्त मंदिर सुदामपुरीमैदानातआयोजित ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, आयुक्त अभिजीत बांगर आदी उपस्थित होते.

 

यावेळी नेहरूनगर झोनमधील दोनशेच्या वर तक्रारींचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निपटारा केला. नेहरूनगर झोनमधील दर्शन कॉलनी, सुदामपुरी, भांडेप्लॉट, राजेंद्रनगर, न्यू डायमंड नगर, वाठोडा, संत गाडगेबाबा नगर, भाग्यश्री नगर, बापूनगर, ओमनगर, दत्तात्रयनगर यासह अनेक भागात नागरिकांना पाण्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गढूळ पाणी, नियमीत पाणी पुरवठा न होणे, अल्पवेळ पाणी पुरवठा, अवाजवी पाणी बिल अशा अनेक समस्यांमुळे दररोजच नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागतो. नागरिकांचा वाढता रोष पाहता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिका-यांना चांगलेच फटकारले.  नेहरूनगर झोनमध्ये प्रथम पाण्यासंबंधी अडचणी असणा-या भागामध्ये सर्व्हे करून येत्या सात दिवसांमध्ये आयुक्तांपुढे अहवाल सादर करून केलेल्या कार्यवाहीची माहिती देणे, तसेच १५ दिवसांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठकीत कार्यवाहीची माहिती देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. याशिवाय शहरातील संपूर्ण विहिरींची स्वच्छता करून तिथे लघुनळ योजनेद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे असेही निर्देश त्यांनी दिले. पाण्याच्या समस्येचे गांभिर्य जपत मनपाच्या डेलिगेट्सनी ओसीडब्ल्यूच्या कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवण्याचे यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी निर्देशित केले.

सक्करदरा येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले पुतळ्याच्य सौंदर्यीकरणाची मागणी यावेळी नागरिकांनी केली.  झोनमधील १८ मीटरच्या पांदण रस्त्याच्या बांधकामात अडसर ठरणा-या ७७ झोपड्यांचे पुनर्वसन करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर देणे व पांदण रस्त्याबाबतची कार्यवाही करण्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देशित केले.

मानेवाडा चौक ते वाठोडा चौकापर्यंत रिंग रोडवरील सर्व अनधिकृत भंगार दुकानांमधील विद्युत कनेक्शनही तोडण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. याशिवाय दिघोरी चौक ते मानेवाडा चौकादरम्यान मार्गावर रेतीचे ट्रक रस्त्यावरच उभे ठेवण्यात येतात. या मार्गावर सिमेंट रोडचे बांधकाम सुरू असून रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. रस्त्यावरच रेतीचे ट्रक उभे राहत असल्याने परिसरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीवर आमदार सुधाकर कोहळे यांनी लक्ष वेधले. शिवाय भांडेप्लॉट ते दिघोरी चौकापर्यंतही रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगची समस्या आहे. दोन्ही तक्रारींसंबंधी आज सायंकाळपासूनच कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलिस उपायुक्त निलेश भरणे यांनी सांगितले.

 

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़