केंद्रातील सर्वात यशस्वी मंत्री म्हणून नितीन गडकरी यांच्या नावाचा उल्लेख होतो. त्यामुळेच नितीन गडकरी विरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी देईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसने आज (बुधवारी) २१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील ५ उमेदवारांची नावे आहेत. त्यामध्ये विदर्भातील २ उमेदवारांची वर्णी लागली आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गडचिरोली येथून नामदेव उसेंडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. नाना पटोले यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होते. मात्र, त्यांच्या नावावर बहुजन समाजातील अनेक संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांची उमेदवारी धोक्यात आली असल्याचे बोलले जात होते. मात्र, या सर्व शंकांना विराम देत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या यादीत नाना पटोले यांच्या नावावर अंतिम मोहर उमटवली आहे.
नाना पाटोले मतदारांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत, असे मेश्राम म्हणाले. नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. दोन तीन दिवसात नागपूर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला जाईल. फक्त नागपूरमध्येच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीला मतदान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नागपुरातील बहुजन समाजाने पटोले यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे पटोले यांची उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.