
नागपूर: गीतरामायण या स्वरकाव्यशिल्पाचे दोन शिल्पकार म्हणजे ग.दी.माडगूळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे २०१९ हे जन्मशताब्दी वर्ष.या दोघांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी विदर्भातील संस्कार भारतीतर्फे गीतरामायण महायज्ञाचे आयोजन गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत साजरे झाले. शनिवारी रामेश्वरी येथील राम मंदिरात रसिकांनी गीत रामायणाची अविट गोडीचा आनंद लृटला. नूपूर संगीत व कलाआराधनाच्या कलावंतांनी एकूण सोळा गीते सादर करुन या अभिजात गीतांची संस्कार भारतीच्या या महायज्ञात सुरेल समिधा वाहीली. रचना खांडेकर -पाठक यांनी ’स्वये श्री रामप्रभू ऐकती,कुश लव रामायण गाती’ हे पहीले पुष्प वाहीले. राम कथा ही संस्काराची गंगोत्रीच आहे. रामकथा ही शाश्वत,पवित्र कथा असून काव्याच्या रुपात अमृत संचय आहे.

पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथाने पुत्रकामेष्टि यज्ञ मांडला. या यज्ञातून जो दिव्य प्रसाद मानवरुपात अवतरला ते ’दशरथा घे हे पसायदान’हे गीत अभय पांडे यांनी समरसून गायले. महान संस्कारातून दिव्य,पराक्रमी राजपूत्र याचा जन्म झाला ते ’राम जन्मला गं सखी राम जन्मला’ गीत दिपाली जोगळेकर यांनी सादर करुन रसिकांची दाद मिळवली. विश्वामित्र यांनी १६ वर्षांच्या श्रीरामाला असुरांचे पारिपत्य करण्यासाठी मागून घेतले ते ’ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा’ हे गीत मिलींद कोरटकर यांनी सादर केले. अहिल्या म्हणजे न नांगरलेली जमीन आणि रामाने तिचा उद्धार केला. ‘रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले’ हे गीत करुणा दांडेकर यांनी सादर केले. राम-सीतेचा विवाह जणू ‘आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे,स्वयंवर झाले सीतेचे’ अभय पांडे यांनी सादर केले.कैकेयीच्या असूयेने रामाला चौदा वर्षांचा वनवास घडतो. सीतेचा निरोप घेण्यास आलेल्या श्रीरामाला त्याची अर्धांगिनी,सहचारीणी आर्त स्वरात म्हणते ‘निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता’श्रवणांनाही जिव्हा फुटाव्यात असे स्वर संगीत रचना खांडेकर यांनी या गीतात अर्पण केले. कार्यक्रमात ‘नकोस नौके परत फिरु गं’ अभय पांडे, ‘मज आणून द्या हो हरीण अयोध्या नाथा’ भाग्यश्री शिंगरु,’सेतू बांधा रे सागरी’मिलिंद कोरटकर यांनी सादर केले. श्रीरामरूपी नील गगनाचं छत्र आणि सितारुपी उषा योध्याच्या क्षितिजा वरून १४ वर्षे अस्तंगत होणार असल्याने अयोध्येत आता अंधार काळरात्रच राहणार या भयाने व्याकुळ प्रजाजन श्रीरामाला घेऊन जाणाऱ्या सुमंताला विनवीत असतात ’थांब सुमंता थांबवी रे रथ’ हे गीत महेश मगरे यांनी भावपूर्ण स्वरात सादर केले. श्रीरामाच्या वियोगाने व्याकुळ झालेल्या भरताला श्रीराम समजवतात’ दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा..पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ अभय पांडे यांनी गायलेल्या या गीताने रसिकही अंतर्मुख झाले. ’प्रभो मज एकचि वर द्यावा’पूजा पाठक यांनी सादर केले. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन राज्य करणाऱ्या आणि रामभेटी साठी आतुर भरताने रामाच्या स्वागतासाठी दिवाळीच साजरी केली. भरताचा हा आनंद ’त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार’’पुष्पा जोगे यांनी समरसून सादर केले.’अवघ्या आशा श्रीरामपर्ण’ हे एकच मागण वाल्मीकीने मागितले,’रघु राजाच्या नगरी जाऊन,गा बाळांनो श्रीरामायण’ रचना खांडेकर-पाठक यांनी गायलेल्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
नंदा सराफ,पद्मा रावळे यांनी सहगायनात साथ दिली. की-बोर्डवर हर्ष गडकरी,तबल्यावर रघूवीर पुराणिक व प्रभावत चन्ने,ताल वाद्यावर निधी रानडे व वेदिका जोगळेकर यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. सूत्र संचालन कांचन भालेकर यांचे होते. संहिता लेखण आशुतोष अडोणी यांचे तर ज्येष्ठ ताल वादक गजानन रानडे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाला लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नुपूर संगीतच्या रचना खांडेकर-पाठक व कलाआराधनाच्या संचालिका मैथिली मगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur