
केरळ: अमेठीसह केरळच्या वायनाड मतदार संघातूनही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते व माजी संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांनी रविवारी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत केली आणि हा मतदार संघ क्षणात देशाच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू बनला. केरळ राज्य काँग्रेसने केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेतला असल्याचेही अँटनी यांनी सांगितले. राहुल यांच्या या निर्णयानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष(माकप)आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) कमालीचा नाराज झाला असून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही राहुल यांना अमेठीप्रमाणे कोंडीत पकडण्यासाठी ‘नहले पे दहला’ चाल खेळली असून तुषार वेल्लापल्ली यांच्या नावावी घोषणा एनडीएकडून करण्यात आली.
राहुल गांधीच्या उमेदवारीवरून संतापलेल्या डाव्यांनी त्यांना पराभूत करण्याची घोषणा केली असतानाच आता भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वाखालील एनडीएनेही वायनाडमधील आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. वायनाडमधून एनडीएचा घटकपक्ष असलेल्या भारत धर्म जनसेना (बीडीजेएस) चे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तुषार वेल्लापल्ली हे केरळमध्ये स्थानिक पक्ष असलेल्या भारत धर्म जनसेना पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच श्री नारायण धर्म परिपालन योगम (एसएनडीपी) चे उपाध्यक्षसुद्धा आहेत. त्यांच्या नावाची घोषणा करताना अमित शहा म्हणाले की, ”तुषार वेल्लापल्ली हे विकास आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने कटिबद्धतेसाठी प्रतिनिधित्व करतील. त्यांच्या मदतीने केरळमध्ये भाजपा एक राजकीय पर्याय म्हणून समोर येईल.” भाजपा आणि भारत धर्म जनसेना पक्षाची केरळमध्ये आघाडी झाली असून, हा पक्ष केरळमधील पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. तुषार वेल्लापल्ली यांना त्रिसूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. तसेच त्यांनी प्रचारसही सुरू केला आहे. दरम्यान, राहुल गांधी वायनाड येथून लढल्यास उमेदवारीत बदल होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, राहुल गांधींविरोधात प्रबळ उमेदवार उतरवण्यासाठी वायनाडची जागा भाजपाला देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र भाजपने राहुल गांधी यांना त्यांच्या दोन्ही उमेदवारी क्षेत्रात कोंडीत पकडण्यासाठी तगडे उमेदवार दिले असल्याची देशात चर्चा आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur