मुंबई – आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीसंदर्भात दोन्ही पक्षांत अद्याप कलगीतुरा सुरू असून, युती होणारच, असा ठाम विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे होणार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही बाब स्पष्ट केल्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होण्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात सुरू होती. त्यामुळे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम संपवा, अशी विनंती राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक निर्णय जाहीर करतील, अशी राज्यातील नेत्यांमध्ये भीती होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी विधानसभा-लोकसभा निवडणुका स्वतंत्र होणार असल्याचे संकेत दिल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना भाजपची युती होणार असल्याचा ठाम विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. मात्र, शिवसेना नेत्यांकडून विरोधाचा सूर आळवण्यात येत आहे. निवडणूक जवळ येत असताना शिवसेना अद्याप नाराज असल्याने भाजप अस्वस्थ असल्याचे सूत्रांनी सांगितले.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur