मेट्रो रेल्वेचे खड्डे -पंचवीस वाहनचालक कोसळले.

spot_img

नागपूर:  मेट्रो रेल्वेच्या कामामुळे शहरात ठिकठिकाणी खड्डे करण्यात आले.  शनिवारी रात्री कॉटन मार्केट चौकात मेट्रोचे कर्मचारी नसल्याने रात्री आठपर्यंत जवळपास पंचवीसहून अधिक वाहनचालक एकापाठोपाठ कोसळले. काहींची वाहने फुटली तर, काही वाहनचालक जखमी झाले. एका महिलेचा हात फ्रॅक्चर झाल्याचीही माहिती आहे. आजूबाजूच्या परिसारतील अनेक दुकानदारांनी दिवसभरात अनेक वाहनचालक चिखलात पडल्याची माहिती दिली.

खड्डयाच्या ठिकाणी जलवाहिनी आल्याने ती स्थानांतरीत करण्यासाठी ओसीडब्लूला महामेट्रोने निधी दिला. ही जलवाहिनी स्थानांतरीत करण्याचे काम सुरू झाले. मात्र, जलवाहिनी कुठेतरी लीकेज  असल्याने पाणी चौकात पसरले. त्यामुळे चिखल झाला. रस्त्यातही घसरण झाल्याने वाहनचालक घसरू लागले. शनिवारला सायंकाळी तर एका पाठोपाठ अनेक वाहनचालक रस्त्यांवरच कोसळले. आधीच या चौकातील सिग्नल स्टॉपिंग वेळ कमी असल्याने वाहनचालकांची पळापळ असते. शिवाय, या चौकातून सिग्नल जंप करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. एवढेच नव्हे तर चौकातच बस थांबा असल्याने वाहनचालकांना आधीच सुरक्षितपणे वाहन चालवावे लागते. अशात वाहनचालकांची उडणारी तारांबळ अनेकांसाठी जीवघेणी ठरते. शनिवारी रात्री बस स्थानक परिसरात राहणाऱ्या गोखले या महिला चौकातच घसरल्या. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. यासोबतच जवळपास पंचवीसहून अधिक वाहनचालकही ऐन चौकात येऊन हबकले. त्यामुळे त्यांचेही वाहन घसरले. अनेकांच्या पायाला दुखापत झाली. रात्री मेट्रोचे सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला. चौकात तैनात वाहतूक पोलिस धावून आले. मेट्रोच्या कामासाठी कॉटन मार्केट चौकात दोन दिवसापूर्वी पिलरसाठी मोठा खड्डा करण्यात आला. ऐन चौकात हा खड्डा असल्याने वर्दळीच्या या मार्गावरून जाणाऱ्या अनेक वाहनचालकांची मोठी पंचाईत झाली. दिवसा या खड्डयामुळे वाहनचालक सुरक्षित अंतर ठेवून असतात. परंतु, रात्री वाहनचालकांना अडचण होत आहे. कामही व्हावे व वाहतुकीला त्रास होऊ नये म्हणून काही सुरक्षात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या. कठडेही सभोवताल लावण्यात आले. परंतु, रात्री वाहन चालवितांना अडचण होते.परिसरातील नागरिक व दुकानदारांनी धाव घेत रस्त्यांवर पडलेल्या वाहनचालकांना मदतीचा हात दिला. हा चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गर्दीचा असल्याने महामेट्रोला व ओसीडब्लूलाही तातडीने काम करून घेणे अत्यावश्यक झाले आहे. शनिवारी रात्री या ठिकाणी मेट्रोचे कुठलेही कर्मचारी नव्हते असा संताप माजी नगरसेवक मनोज साबळे यांनी व्यक्त केला.

——————————-

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़