हॅमिल्टन (न्यूझीलंड) : न्यूझीलंडच्या पुरुष आणि महिला संघाने रविवारी भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळविला. पुरुष संघाने अखेरच्या सामन्यात 4 धावांनी सरशी साधत 2-1, तर महिलांनी 2 धावांनी विजय मिळवून 3-0 अशी मालिका जिंकली. कॉलिन मुन्रो, टीम साऊदी आणि सोफी डिव्हाइन न्यूझीलंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
मुन्रो, साऊदीची निर्णायक कामगिरी
कॉलिन मुन्रोच्या स्फोटक 72 धावांच्या खेळीनंतर टीम साऊदीच्या अखेरच्या अनुभवी षटकाने भारताला विजयापासून वंचित ठेवले. त्यात भारतीय क्षेत्ररक्षकांकडून सोडलेले गेलेले झेलदेखील त्यांच्या पराभवाच कारणीभूत ठरले.
न्यूझीलंडच्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन वगळता भारताच्या बढती मिळालेल्या फलंदाजांनी आश्वासक फलंदाजी म्हणण्यापेक्षा फटकेबाजी केली; पण धावांचा वेग वाढवताना कुठे थांबायचे आणि संयम कसा बाळगायचा, या आघाडीवर भारतीय युवा खेळाडू कमी पडले. विजय शंकर आणि रिषभ पंत यांनी जरूर न्यूझीलंडच्या गोलंदाजांची लय बिघडवली; पण त्यांना कुठे थांबायचे ते कळले नाही. संयम बाळगून कर्णधार रोहितच्या साथीत ते भागीदारी वाढवू शकले नाहीत. त्यानंतर विजयासाठी 3 षटकांत 47 धावांची आवश्यकता असे समीकरण असताना दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्या यांनी 18 आणि 19 या दोन षटकांत 32 धावा कुटल्या; पण साऊदीच्या अखेरच्या षटकांत त्यांना 11 धावांच मिळाल्या. दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घ्यायची की नाही, या नादात या जोडीने अखेरच्या षटकातील एक महत्त्वपूर्ण चेंडू “डॉट’ घालवला. या षटकांत अखेरचे तीन चेंडू टाकताना साऊदीने चेंडूचा राखलेला टप्पा आणि चेंडूला दिलेली खोली खूप महत्त्वाची ठरली. त्यामुळे भारताचा डाव 6 बाद 208 असा मर्यादित राहिला.
सततच्या अपयशानंतर विश्वकरंडकासाठी संघातील स्थान पणाला लागलेल्या मुन्रोच्या स्फोटक फलंदाजीने सामन्यात पडणाऱ्या धावांच्या पावसाची कल्पना दिली. टीम सैफर्टच्या साथीत 8 षटकांतच 80 धावांची सलामी देण्याऱ्या मुन्रोने नंतर एकहाती भारतीय गोलंदाजीची पिटाई केली. त्याने 40 चेंडूंत 5 चौकार आणि तेवढेच षटकार ठोकून 72 धावा केल्या. कुलदीपने त्याला बाद केले. पाठोपाठ खलीलने विल्यम्सनचा अडसर दूर केला. यामुळे त्यांचा धावांचा वेग मंदावला. तरी कॉलिन डी ग्रॅंडहोमच्या 16 चेंडूंतील 30 धावांनी न्यूझीलंडचे आव्हान भक्कम केले.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur