नवसंकल्पनांच्या उपयोगाबाबत दूरदृष्टीकोन बाळगा : महापौर नंदा जिचकार

spot_img

‘बौद्धिक संपदा‘ विषयावर कार्यशाळेचे उद्घाटन
नागपूर, ता. १६ : विद्यार्थ्यांमध्ये आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आहे. ‘हॅकथॉन’ला मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अनेक नवसंकल्पना पुढे आल्या आहेत. या नवसंकल्पना केवळ कादगावरच न राहता त्याचा प्रत्यक्ष समाजासाठी उपयोग होणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनो आपल्या नवसंकल्पनांसंदर्भात दूरदृष्टीकोन बाळगा व आपल्या संकल्पनाचे पेटेंट मिळविण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया समजून घ्या, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’अंतर्गत महापौर इंनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने शनिवारी (ता. १६) सिव्हील लाईन्स येथील राजीव गांधी इंस्टिट्युट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲण्ड मॅनेजमेंटच्या सभागृहात ‘बौद्धिक संपदा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, पेटेंट, डिझाईन ॲण्ड ट्रेड मार्कचे डिप्टी कंट्रोलर पंकज बोरकर, रिड टू इनोव्‍हेट वर्ल्डवाईड फोरमचे सहसंस्थापक ज्ञानेश्वर कांबळे, महापौर इनोव्हेशन कौन्सिलचे कार्यवाहक डॉ. प्रशांत कडू, केतन मोहितकर उपस्थित होते.

मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने नुकतेच कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘हॅकॉथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ७५० नवसंशोधकांनी आपल्या संकल्पना सादर केल्या. यामधील बहुतांशसंकल्पना नावीन्यपूर्ण आहेत. या आणि अशा संकल्पनांना रजिस्टर करण्यासाठी, पेंटट मिळविण्यासाठी काय करावे, याबद्दल माहिती देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांनी महापौर इनोव्हेशन अवॉर्डकरिता नोंदणी केली आहे विशेषत्वाने त्यांच्याकरिता सदर कार्यशाळेचे आयोजन महापौर नंदा जिचकार यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, ‘हॅकॉथॉन’च्या माध्यमातून ७५० नवसंकल्पना आपल्याला मिळालेल्या आहेत. या संकल्पनांचा समाजासाठी उपयोग व्हावा यासाठी त्या ‘कमर्शिअल’ करणे आवश्यक आहे. यासाठी त्याचे पेटेंट मिळवून त्याचा ख-या अर्थाने समाजासाठी व स्वत:साठीही उपयोग होणार आहे. यासाठी या संकल्पनांची नोंदणी व पेटेंट मिळविण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. आज प्रत्येकाला ‘शॉर्टकट’मध्येच सर्व हवे आहे. मात्र आपल्या नवसंकल्पना ह्या ‘शॉर्टकट’ नाहीत व त्याचा तसा उपयोगही होउ नये, यासाठी आपल्या संकल्पनांच्या उपयोगासंदर्भात दुरदृष्टीने विचार होणेही गरजेचे आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

आजचे विद्यार्थीच उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांनाच पुढे नेतृत्व करायचे आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे येउन आपल्या शहरासाठी आपले योगदान द्यावे. यासाठी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना चालना देण्याच्या उद्देशाने मनपातर्फे ‘लिडरशिप’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या शहरातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, आपल्या संकल्पना पुढे आणाव्‍यात यासाठी नागपूर महानगरपालिका विविध व्यासपीठ सदैव उपलब्ध करून देत आहे. बदलत्या नागपूर शहरात आपले योगदान देउन शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे येण्याचे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले.

कार्यशाळेत पेटेंट, डिझाईन ॲण्ड ट्रेड मार्कचे डिप्टी कंट्रोलर पंकज बोरकर यांनी पेटेंटची प्रक्रिया व त्यातील आवश्यक बाबींची माहिती दिली. पेटेंटबाबत विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती असणे आवश्यक असून पेटेंट, डिझाईन ॲण्ड ट्रेड मार्कद्वारे www.ipindia.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रिड टू इनोव्‍हेट वर्ल्डवाईड फोरमचे सहसंस्थापक ज्ञानेश्वर कांबळे यांनीही देशाच्या विकासासाठी आपल्या नवसंकल्पनांचे पेटेंट किती महत्वाचे आहे याचे महत्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी पेटेंट संबंधी विविध प्रश्नांद्वारे आपल्या शंका उपस्थित केल्या. पेटेंट, डिझाईन ॲण्ड ट्रेड मार्कचे डिप्टी कंट्रोलर पंकज बोरकर व रिड टू इनोव्‍हेट वर्ल्डवाईड फोरमचे सहसंस्थापक ज्ञानेश्वर कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकांचे निरसरण केले.

कार्यक्रमाचे संचालन महापौर इनोव्हेशन कौन्सिलचे कार्यवाहक डॉ. प्रशांत कडू यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येत शहरातील नवसंशोधक उपस्थित होते.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़