
धंतोलीत वीज ग्राहकाला ‘धक्का’:महावितरणने पाठवले चक्क पावणे तीन लाखांचे बिल!
[डॉ.ममता खांडेकर]
नागपूर: धंतोलीतील वीज ग्राहक चैताली बापट यांना महावितरणने काही हजार नव्हे तर चक्क पावणे तीन लाखांचे बिल पाठवले. ते बघून चैताली यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने काली माता मंदिराजवळील वीज कार्यालय गाठले. नेहमी दहा-बारा हजारात येणारे बिल शंभर पटीने वाढून कसे मिळाले ते ही कोणतीही मीटर रिडिंग न घेता कारण त्यांना पाठविण्यात आलेल्या विज बिलात मीटर रिडिंगच घेण्यात आली नसल्याचे किती यूनिट जाळले हे कळायला मार्गच नव्हते. तेथील सहायक अभियंता लांजेवार यांनी बापट यांना मीटर रिडिंग घेण्यास माणूस पाठवतो म्हणून सांगितले मात्र पंधरा दिवस झाले तरी मीटर तपासणीसाठी बापट यांच्या घरी कोणीही फिरकले नाही.
२१ मार्च रोजी भर उन्हात २.३० वा.अचानक दोन कर्मचारी यांनी बापटांच्या घरची मीटर रिडिंग घेतली व वीज कापून निघून गेलेत. त्या वरच्या मजल्यावर जेवत होत्या. चैताली यांना कळले वीज वितरणचे दोन कर्मचारी यांनी घर मालकाशी कोणताही संपर्क न करता वीज कापून निघून गेले. हातातले ताट तसेच ठेऊन चैताली यांनी पुन्हा कॉंग्रेमस नगरचे कार्यालय गाठले. दीड तास वाद घातल्यानंतर सध्या मीटर रिडिंग उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही 17,500 रुपये अंदाजे भरुन द्या यानंतर तांत्रिक बाबी तपासून बील दुरुस्त करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. भर उन्हाळ्यात कोणताही दोष नसताना वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका ग्राहकाला उगाच मनस्ताप तर भाेगावा लागलाच मात्र 17,500 रुपये तरी कोणत्या आधारावर घेतले याचा िहशोब चैताली यांना लागत नसल्याचे खास ’सत्ताधीश’न्यूज पोर्टलशी बोलताना त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात रणरणत्या उन्हात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी एका वीज ग्राहक महिलेची वीज भर दूपारी सगळे नियम धाब्यावर बसून कापत असतील तर ग्राहक म्हणून नागरिकांनाच यावर विचार करण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल.
हा तांत्रिक दोष- लांजेवार(सहा.अभियंता)
आमच्या संगणकामध्ये बापट यांचे बिल डिसेंबर महिन्यापासून पेंडिग असल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे त्यांची वीज कापण्यात आली. पूर्वी ग्राहकाला नोटीस पाठविली जात होती मात्र गेल्या महिन्यापासून मोबाईलवर एसएमस पाठविला जातो. बापट यांना एसएमस देखील मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. हा सर्व दोष तांत्रिक असून लवकरच याचे निराकरण केले जाईल.
नियम एनएआरसीचा ‘आमचा’नव्हे!- पराग ठाणेवाला(अति.कार्यकारी अभियंता)
ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा ज्यांना लिहता-वाचता येत नाही अश्या ग्राहकांना पूर्वी सारखेच पेपर बिल न पाठवता मोबाईलवरच मॅसेज पाठवून बिल किंवा नोटीस देणार का? असा प्रश्न विचारता हा नियम आमचा नसून एनएआरसीचा असल्याचे पराग ठाणेवाला यांनी सांगितले. वरुन जे आदेश येतात आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी करतो. निरक्ष् र ग्राहकांचा विचार एनएआरसीने करावा ते आमच्या अधिकारात नाही.
ग्राहक न्यायालयाकडे दाद मागितली पाहीजे-नीलेश नागोलकर (सचिव, ग्राहक न्याय परिषद)
मुळात कोणत्याही ग्राहकाची वीज ही नोटीस न देता व घरमालकाला न कळवता वीज वितरण कर्मचार्यांना कापता येत नाही. कायद्याने हा गुन्हा ठरतो. ग्राहक त्वरीत याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला करु शकतो. ग्राहकाने एका महिन्याचे बिल न भरल्यास दुसर्या महिन्याच्या बिलात ती रक्कम जोडून येते. दुसर्या महिन्याचे बिल न भरल्यास तिसर्या महिन्यात पुन्हा सर्व रक्कम जोडून येते. तीन महिने ग्राहकाने बिल न भरल्यास आधी ग्राहकाला प्राथमिक नोटीस पाठविल्या जाते. यात वीज भरण्याचा दिनांक लिहला असतो, बिल न भरल्यास वीज वितरण कंपनी मगच ग्राहकाची वीज कापू शकते. मात्र अचानक घरी येऊन घर मालकाला न कळवता, कोणतीही नोटीस न देता कोणत्याही ग्राहकाची वीज कापता येत नाही. बापट यांनी त्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल व मीटर रिडिंग न घेता त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेल्या 17,500 रुपयांबद्दल कोणालाही न भीता ग्राहक न्यायालयात दाद मागावी. ग्राहक न्याय परिषद त्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करेल.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur