दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
नागपूर: दोन अल्पवयीन मुलींचे दुचाकीने अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करण्याची घटना नागपुरात आज घडली. झाडाझुडूपात नेऊन चाकूच्या धाकावर हा बलात्कार करण्यात आल्याची घटना लकडगंज परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लकडगंजमधील मिनीमाता नगर परिसरातील सहा वर्ष व चार वर्ष वयाच्या दोन चिमुकल्या मुली २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात खेळायला गेल्या होत्या. दरम्यान एका अज्ञात युवक तेथे आला. त्याने दोन्ही मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवले. दोन्ही मुलींना दुचाकीवरून घरी सोडून देतो असे त्यांना म्हटले. मोठ्या मुलीने नकार दिला. तर लहान मुलगी दुचाकीवर बसली. थोड्या दूर गेल्यानंतर तो पुन्हा परत आला. त्याने मोठ्या मुलीलाही बळजबरीने दुचाकीवर बसवले. दोघींनाही मिनीमाता रेल्वे लाईन जवळच्या हल्दीराम फॅक्ट्रीच्या पाठीमागील झाडीझुडपात नेले. तेथे चाकूच्या धाकावर दोघींसोबतही लैंगिक अत्याचार केला. दोन्ही मुलिंना तेथेच सोडून आरोपी पळून गेला. रात्रीचे साडेआठ वाजता त्या दोघीही अंधारात घराची वाट शोधत पायी जात होत्या. त्या अंधारात हातात कपडे घेऊन फिरत असल्याचे बाजुच्या कारखान्यातील मजुरांच्या लक्षात आले. त्यांच्या मुलींवर अतिप्रसंग झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या मुलींना घराचा पत्ता विचारुन घरी नेऊन दिले व त्यांच्या आईवडीलांच्या ताब्यात दिले. यानंतर याची लकडगंज पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur