काही शब्दांची आता धास्ती वाटते!- महेश एलकुंचवार

९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे थाटात उदघाटन
नयनतारा सहगल यांना नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उदघाटक पद सोडावे लागले तेव्हा अनेक शुभचिंतकानी माझंही ‘नयनतारा’ होईल अशी भीती दाखवली, उदघाटक म्हटलं की हल्ली लोक दचकतात, परिणामी वयाच्या ८० व्या वर्षी काही शब्दांची आता धास्ती वाटायला लागली असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ नाटककार प्रा.महेश एलकुंचवार यांनी केले.ते रेशीम बाग येथे आयोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे उदघाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर महापौर नंदा जिचकार, अ.भा.मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ प्रसाद कांबळी, कार्याध्यक्ष गिरीश गांधी,अ.भा.म.नाटय परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे,अ.भा. म.नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह नरेश गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना एलकुंचवार म्हणाले ,की ‘नाट्यकर्मी’ या शब्दाला मर्यादा आहे, काही दशकांपूर्वी डॉ.लागूंनी ‘नाट्य धर्मी’ शब्द रूढ करण्याचा प्रयत्न केला होता,धर्म हा विषयच गहन आहे,दुसऱ्यांना दुःख न देणे म्हणजे धर्म मात्र आजच्या काळात धर्माचा अर्थही बदलला आहे.’ज्यांना अमच्यासारखं वाटत नाही ते धर्मद्रोही,देशद्रोही’ ठरविल्या जात आहे,हे बघून मनात विशाद दाटून येतो. हल्ली वेद, उपनिषदांनाही चांगले दिवस आले आहेत,विमानाची निर्मिती,टेस्ट ट्यूब बेबी ई. सर्व उपनिषद मधुनच आल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे औदार्य कुठे गेलं? सगळे मिळून एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान हे सगळं कुठे गेलं? असा प्रश्न त्यांनी केलं. तो धर्म ती संस्कृती आता नाही हे बघून विशाद दाटून येतो,कुठून कुठे आलो! तरीही स्वतःला ‘सहिष्णू’ समजतो! शफदर हाश्मीचा भर दिवसा मूडदा पडतो, सेनेटिक वर्सेस पुस्तकावर बंदी आणली जाते,घाशीराम कोतवाल,सखाराम बायंडरवर राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाने संमती दिल्यानंतरही बंदी आणली जाते, याचा अर्थ आम्ही सहिष्णू कधीच नव्हतो, धर्म शब्दाची व्याख्या बदलवत जर आम्ही औदार्य विसरतोय तर हा शब्द उच्चरण्याचा हक्कही आपल्याला नाही अशी टीका एलकुंचवार यांनी केली. आपल्याकडे वादाची परंपरा तरीही ‘साहिष्णुते’ विषयी बोलतो,म्हणूनच खऱ्या नाट्य धर्मीवर प्रचंड जबाबदारी आहे. अनेक गोष्टींना नाही म्हणावे लागेल. बहुतांश नाट्यकर्मी असतात,धर्मी नाही, त्यात चूक नाही,कुणाला संपत्ती हवी असते,कोणाला प्रसिद्धी नाटक हेच मुळात सर्वसमावेशक आहे. प्रायोगिक हे व्यावसायिकला नाके मुरडतात,इतर प्रकारच्या नाटकाबद्दलही आदर बाळगून एकत्र येऊन काम करावे,असा सल्ला त्यांनी दिला,निकोप कसे जगता येईल,हा विचार या नाट्य संमेलनाच्या अनुषंगाने केला तरी पुष्कळ मिळाले, असं मला वाटतं.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur