
नागपूर: ज्या देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिक जाळे आहेत त्या देशांनी नेत्र दिपक प्रगती केली. महामेट्रोमुळे नागपूर शहरालाही आज एक नवा चेहरा मिळाला आहे. मेट्रो म्हणजे नव्या भारताची नवी संकल्पना असून नागपूर शहरातील नागरिकांसाठी मेट्रो खूप मोठी भेट असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते खापरी ते सीताबर्डी मेट्रो मार्गाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी,ऊर्जा व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार,खा. कृपाल तुमाने, खा. डॉ.विकास महात्मे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले,की ज्याप्रमाणे शरीरात अनेक धमण्या असतात मात्र मुख्य धमणी खूप महत्त्वाची असते त्याचप्रमाणे मेट्रो ही नागपूर शहरातील मुख्य धमणी आहे. मेट्रोसोबतच इलेक्ट्रिक टॅक्सी,बसेस,सायकल,बाईक्स जुळणार त्यामुळे खासगी वाहतुकीवरचा भार कमी होणार.’ Walk to Work’ ही संस्कृती खऱ्या अर्थाने आता नागपूरकर जगणार. मेट्रोमुळे हजारो लोकांना आज रोजगार उपलब्ध झालेत.६५ टक्के ऊर्जा मेट्रो सोलारद्वारे प्राप्त करणार आहे त्यामुळेच मेट्रो ही स्वस्त आणि सोयीची झाली आहे. नागपूरची मेट्रो सस्टेनेबल नव्हे तर सुपर सस्टेनेबल झाली आहे.आज जगात स्मार्ट मोबॅलिटीत म्हणजे फक्त मेट्रो आहे असे ते म्हणाले. २१ सा व्या शतकाची खऱ्या अर्थाने नागपूरात सुरवात झाल्याचे ते म्हणाले. जगात सर्वात जास्त प्रदूषणात वाहतूकीची संसाधने भर घालतात.मेट्रोमुळे प्रदूषणात घट होईल असे ते म्हणाले.
चुका मी आधी शोधतो- गडकरी
माझी सवय आहे चुका मी आधी शोधतो मात्र मेट्रोच्या या प्रकल्पात मला कोणत्याही चुका सापडल्या नाही. गुणवत्तापूर्ण, स्वस्त,कमी खर्चात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमी वेळेत मेट्रोने हे काम पूर्ण केले. सुरवातीला ज्या विभागा विषयी माझे मत फारसे चांगले नाही अश्या रेल्वे विभागातून ब्रूजेश दीक्षित हे आले असल्याने माझ्याही मनात शंका होती मात्र प्रकल्पासाठी त्यांनी केलेले काम हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मेट्रोसाठी मोक्याच्या जागा आम्ही मिळवून दिल्या. या प्रकल्पातून आता महापालिकेलाही २०० कोटींचे उत्पन्न मिळणार आहे नाहीतर दर वेळी मनपाकडे विष घ्यायलाही पैसे नसतात,अशी कोपरखळी त्यांनी मारली. नुकतेच लखनऊ मेट्रो मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ४ हजार कोटी रुपये गुंतवल्याचे सांगत आता उर्वरित उत्तर प्रदेशचा विकास कसा करावा हा प्रश्न त्यांना छळत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ब्रॉडगेज मेट्रो म्हणजे ट्रान्सपोर्ट क्षेत्रातली क्रांती असल्याचे गडकरी म्हणाले. वर्धा ते नागपूर फक्त ३५ मिनिटात आता नागरिक प्रवास करणार. भंडारा,चंद्रपूर,गोंदिया, अगदी उमरेड,कुहिहून नागभीड पर्यंत ब्रॉडगेज मेट्रो पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.१५ दिवसात ४ लाख कोटींचे प्रकल्पांचे भूमिपूजन,उदघाटन केल्याचे त्यांनी सांगितले मात्र सर्वात जास्त आनंद नागपूरच्या मेट्रो मार्गाचा शुभारंभ करताना होत आहे कारण हे माझे घर आहे,माझे शहर असल्याचे ते म्हणाले. सूत्र संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.
‘रोप वे केबल कार’ गडकरींचे स्वप्न-
मेट्रोच्या तुलनेत दीड गुणा जास्त क्षमता असणारी, ५० कोटींनी जास्त महाग,हवेत चालणारी ‘रोप वे केबल कार’ नागपुरात यावी असे स्वप्न आहे.उत्तराखंड येथे पाच जागेवर रोप वे यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मेट्रो ने ६५ टक्के नव्हे तर १०० टक्के सोलार ऊर्जा वापरावी असा सल्ला त्यांनी दिला. याप्रसंगी मेट्रो राईडचा आनंदही त्यांनी लुटला.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur