
नागपूर: शहराच्या माझी मेट्रो प्रकल्पाच्या ‘खापरी ते सीताबर्डी’ मार्गाला रेल्वे सुरक्षा मंडळाने हिरवी झेंडी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीहून ७ मार्च रोजी 3.३० वाजता या उपक्रमाचे उदघाटन करतील. ९ मार्च पासून मेट्रो रेल्वेची ही व्यावसायिक दौड सुरू होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालज ब्रिजेश दीक्षित यांनी पत्र- परिषदेत दिली.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे सुरक्षा मंडळ आणि मेट्रो रेल्वे सेफ्टी या मुंबईतील संस्थेकडून प्रकल्पाच्या सुरक्षितेचे प्रमाणपत्र उदघाटना पूर्वी दोन्ही संस्थांकडून मिळाल्याचा आनंद यावेळी दीक्षित यांनी व्यक्त केला. सुरक्षिततेचे प्रमाणपत्र मिळाल्याने महामेट्रोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र केलेल्या कामाचे फळ मिळाले असून नागपूरकरांचाही त्यात मोठा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच ८ मार्चला आभार दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्या दिवशी सकाळी ८ वाजता सीताबर्डी ते खापरी व खापरी ते सीताबर्डी अश्या दोन फेऱ्या मेट्रोच्या होणार आहे.मेट्रोची ही सफर नागपूरकरांसाठी निःशुल्क राहणार आहे. मेट्रोचे बहुतांश काम पूर्ण झाले असून सध्या फक्त एकाच रेल्वेमार्गावरून मेट्रो धावणार असलीतरी लवकरच अप व डाऊन या दोन्ही मार्गावर मेट्रो धावणार,अशी माहिती त्यांनी दिली.
मेट्रो उदघाटन सोहळा ७ मार्च दुपारी ३.३० वाजता–
मेट्रो रेल्वेचा उदघाटन सोहळा ७ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता सुरू होईल. एअरपोर्ट साऊथच्या परिसरातच मेट्रोचा आजवरचा प्रवास दाखवणारे अत्याधुनिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून यावेळी मेट्रोच्या ‘कॉफी टेबल बुक’ प्रकाशन होणार असून मेट्रोच्या प्रवासावर आधारित चित्रपट देखील दाखवण्यात येणार असल्याचे दीक्षित यांनी पत्र-परिषदेत सांगितले. पत्र-परिषदेला उप-महाव्यवस्थापक अनिल कोकाटे,जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे उपस्थित होते.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur