
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सिनेट सदस्यांच्या अधिकारांना आता नियंत्रित करण्याची मोहिम आखली असून यंदा १२ मार्च रोजी होणाऱ्या सिनेटच्या बैठकीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना वार्तांकनासाठी बंदी घालण्यात आली आहे. सिनेट सभेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येत होते. सभेत होणारे निर्णय,विद्यार्थी व नागरिकांना कळावेत,हा त्यामागील उद्देश्य होता. १९९४ च्या कायदात तशी स्पष्ट तरतूद नाही, नव्या कायद्यात ही अशी तरतूद नाही. परंतु सभागृहाचे कामकाज नियम व प्रथेनुसार करण्यास यावेळी फाटा देण्यात आला असून कायद्यावर बोट ठेवत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सिनेटच्या सभेचे वार्तांकन करण्यास आमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला,अशी माहिती विष्णू चांगदे व इतर सदस्यांनी दिली.
इतकंच नव्हे तर यंदा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील कात्री लावण्यात आली. त्यामुळे सिनेट सदस्यांचा संताप झाला असून,येत्या १२ मार्च ला होणाऱ्या सभेत कुलगुरूंना घेरण्याची तयारी सदस्यांनी केली असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात सदस्यांना प्रश्न विचारण्याची तरतूद नाही,असे कारण देत मागील सिनेट सभेत कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी सदस्यांचे प्रश्न नाकारले होते. दरम्यान,राज्य सरकारकडून आलेल्या समान परिनियमात सदस्यांना किमान दोन प्रश्न विचारण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे कुलगुरूंना माघार घ्यावी लागली. मात्र येत्या १२ मार्च रोजी होणाऱ्या सिनेट सभेसाठी सदस्यांनी १५६ प्रश्न सादर केले. त्यात अनेक प्रश्न प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवणारे असून यावर काय उत्तर द्यावी,असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे,प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रहार करणारे व अडचणीत आणणारे प्रश्न थेट नाकारण्यात आलेत. केवळ ३५ प्रश्नांनाच मान्यता देण्यात आली असून त्यावर आता सिनेट सभेत चर्चा होणार आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur