‘महापौर आपल्या दारी’ मधील समस्यांचा घेतला आढावा

spot_img

‘महापौर आपल्या दारी’ मधील समस्यांचा घेतला आढावा

नागपूर: आज स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण देशात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच गांभीर्य दाखविले आहे. स्वच्छता हा विषयच प्रत्येकाने जबाबदारीने व गांभिर्याने घेण्याचा आहे. याचीच प्रचिती नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता कर्मचा-यांचे पाय धुतले यावरून येते. स्वच्छता हेच प्राधान्य असायला पाहिजे व त्याबद्दल कोणतिही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी दिला.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत लक्षात आलेल्या समस्या व त्यावर अधिका-यांना निर्देश दिल्यानंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा झोन मधील समस्यांच्या निराकरणासंदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल सातही झोनच्या सहायक आयुक्तांनी यावेळी महापौरांकडे सादर केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमामध्ये लक्षात आलेल्या राज्य शासनाच्या अखत्यारितल्या समस्यांसंदर्भात कार्यवाहीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या प्राकलनाची माहितीही यावेळी महापौरांकडे सादर करण्यात आली.

संपूर्ण शहरात स्वच्छता, सफाई कर्मचा-यांची कमतरता, मोकाट कुत्रे, डुक्कर आदींची समस्या आहे. स्वच्छता हा आपला दैनंदिन विषय आहे. त्यामुळे यासंबंधी नियमीत कार्यवाही होणे आवश्यक आहे. दररोज स्वच्छता कर्मचा-यांनी जबाबदारीने आपले कर्तव्य बजावावे, यासाठी संबंधित अधिका-यांकडून योग्य वचक असणेही आवश्यक आहे. स्वच्छतेचा थेट प्रभाव नागरिकांच्या आरोग्यावर पडतो. त्यामुळे प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचा-यांच्या कामावर झोनल अधिका-यांची देखरेख असणे आवश्यक आहे. नागरिकांना ओला व सुका कचरा विलग करण्याची सवय लावणे. स्वच्छतेबाबत नागरिकांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी राहू नयेत यासाठी प्रत्येक वस्त्यांमध्ये कार्यरत सफाई कर्मचा-यांच्या नावाचे फलक तसेच वस्तीमध्ये सफाई कर्मचा-यांचे हजेरी रजिस्टरबाबत योग्य अंमलबजावणी करणेही गरजेचे आहे. याशिवाय नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ दखल घेउन स्वच्छतेबाबत कामचुकारपणा करणा-या सफाई कर्मचा-यांसह झोनल अधिका-यांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिला. विशेष म्हणजे, ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत महापौर नंदा जिचकार यांच्या दौ-यानंतर झोनमध्ये स्वच्छतेच्या तक्रारी कमी झाल्या असून नागरिकांच्या समस्यांचे समाधानही झाले असल्याचे यावेळी सर्व झोनच्या सभापतींनी सांगितले.

नंदीग्रामच्या कामाला गती द्या

शहरातील गायी, म्हशी पालकांमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या गायी, म्हशी पालकांसाठी वाठोडा येथे वेगळे नंदीग्राम विकसीत करण्यात येत असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण झाली असल्याचे संबंधित अधिका-यांनी यावेळी सांगितले. या कार्याला लवकरात लवकर गती देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी आयुक्तांना दिले. याशिवाय शहरातील विविध झोपडपट्ट्या या गडर लाईनवर आहेत. मात्र आता सर्व झोपडपट्ट्यांना पट्टे वितरीत करण्यात येत असल्याने सर्व रहिवासींना योग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. सर्व झोपडपट्टी धारकांच्या सुविधेसाठी योग्य योजना तयार करण्याचेही निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़