अचाट..अफाट’पुन्हा सही रे सही’


नागपूर: ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उदघाटन शुक्रवार दि.२२ फेब्रुवारी २०१९ रोजी रेशीम बाग मैदानात पार पडल्यावर रात्रीच्या ११ वाजता ‘पुन्हा सही रे सही’ हा नाट्य प्रयोग सुरेश भट सभागृहात पार पडला.प्रयोगासाठी नागपूरकर दर्दी रसिकांनी तुफान गर्दी केली. २२०० आसन व्यवस्था असणारे भट सभागृह रसिकांनी तुडुंब भरले होते तर शेकडो रसिकांनी पायऱ्यांवर जागा मिळवली तर शेकडो रसिकांनी तब्बल दोन तास उभे राहून या अचाट..अफाट नाटकाचा आनंद घेतला. मध्यरात्री दीड वाजता प्रयोग संपला आणि ‘आक्रोश’ हे झाडीपट्टीतील नाटक सुरू झाले मात्र ‘भरत जाधव फेम’ रसिकांनी सभागृहातून काढता पाय घेतला.
९९ व्या नाट्य संमेलनाचे उदघाटन सायंकाळी ६.३० वाजता मैदानात होत असताना अनेक नाट्यरसिक तिथे फिरकलेही नाही. जागा मिळावी म्हणून सायंकाळी ६ पासूनच रसिकांनी सभागृहात जागेचा ताबा मिळवण्यास सुरवात केली. भरत जाधव व केदार शिंदे यांच्या ‘सही रे सही’ या नाटकावर महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले,नागपूरकर प्रेक्षकही त्यात कुठेच कमी पडले नाही,पहिल्यांदाच भट सभागृह अशा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गर्दीने ओसंडून वाहत होते. हा देखील एक इतिहासच घडला. भरत जाधव यांचे दुसरे नाव म्हणजेच’पूर्ण ऊर्जा’ असे रसिक म्हणतात. नाटकात ज्या चमत्कारिकपणे ते वेशभूषा बदलतात आणि पटकन मंचावर एन्ट्री करतात ते बघून प्रेक्षक अचंभीत होतात. ‘हा इथून गेला आणि क्षणात तिथून आलाच कसा’ हीच चर्चा प्रयोगानंतर नागपुरातही रंगली. ‘चमत्कार’ नाही तर फक्त ‘वेग’ असल्याचे भरत जाधव सांगतात. तरुण पिढीला मुद्दामून बॅक स्टेज दाखवतो,कुठून येतो,कुठून जातो,हे ते देखील कुतूहलाने शिकतात.
२००२ साली या नाटकाच्या प्रयोगाला सुरवात झाली, त्या पहिल्याच वर्षी ३६५ दिवसात ३६६ प्रयोग झालेत आणि गेल्या १७ वर्षात तीन हजारपेक्षा जास्त प्रयोग ‘सही रे सही’चे महाराष्ट्रसह जगभरात झाले, अजूनही माय-बाप प्रेक्षक या नाटकावर इतकं प्रेम करतात हे मी माझं भाग्य समजतो,असे भरत जाधव सांगतात. मध्यंतरात भरत यांचा सत्कार झाला तेव्हा पांढरा शर्ट आणि पॅन्ट अश्या अतिशय साध्या वेशात ते मंचावर आलेत आणि प्रेक्षकांना अधिकच भावले. मराठी रंगभूमीतील एक असा कलाकार ज्याच्या डोक्यात यश मुळीच गेले नाही,अशी त्यांची ख्याती किती योग्य आहे,हे देखील नागपूरकरांनी काल अनुभवले.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur