विधानसभा होऊ शकते 28 फेब्रुवारीला भंग : अशोक चव्हाण

spot_img

औरंगाबाद –  “लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेण्याची भाजपने तयारी केली असून, येत्या 28 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा भंग करू शकतात. धक्का देऊन पुन्हा सत्तेवर येण्याची भाजपची रणनीती आहे. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी”, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. सात) केले.

सिडको एन- सहा येथील राजीव गांधी स्टेडियममध्ये झालेल्या जाहीर सभेत ते म्हणाले, “निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या आश्‍वासनांची खैरात केली जात आहे. आणखी मोठ्या प्रमाणात घोषणा होतील; मात्र त्यांचा चुनावी जुमला आहे. लबाडाच्या जेवणावर विश्‍वास ठेवू नका. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला केवळ 30 टक्के मते मिळाली, तरी ते सत्तेवर आहेत. त्यामुळे 70 टक्के मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या घरी पाच वेळा जाऊन आलो. आंबेडकरांनी खासदार व्हावे, ही कॉंग्रेसची इच्छा आहे. मतांचे विभाजन टाळा, भाजप-शिवसेनेला पाडा.”

या वेळी माजी मंत्री बाबा सिद्धिकी, माजी खासदार एकनाथ गायकवाड, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, प्रा. रवींद्र बनसोड यांच्यासह इतरांची भाषणे झाली. माजी आमदार कल्याण काळे, नितीन पाटील, केशवराव औताडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़