नागपूर: नागपूरातील लोकप्रिय नृत्य कलावंत शिल्पा शाहीर यांना नृत्याची आवड लहानपणापासूनच होती. खूप लहानपणापासून त्यांनी नृत्य सादरीकरणाला सुरवात केली. नृत्य म्हणजे त्यांच्या जिवनाची जणू मुख्य रक्त-धमनीच बनली. सोनू नक्षणे यांच्या डांस ग्रूपपासून त्यांनी नृत्याची सुरवात केली. हळूहळू त्यांनी स्वत:हून शास्त्रोक्त पद्धीतीने ही कला आत्मसात केली. नृत्यासोबतच त्या नाटकांकडे वळल्या. झाडीपट्टीच्या नाटकात गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्ष् कांना मोहीनी घातली आहे.

पुढे त्यांनी ‘नागपूरी तडका’ हा लावणीचा कार्यक्रम सादर करण्यास सुरवात केली. लवकरच त्यांच्या या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली. या ग्रुपच्या त्या संचालिका आहेत. आपल्या नृत्य दिग्दर्शनाखाली त्यांनी अनेक नवोदित कलावंतांना संधी उपलब्ध करुन दिली. मात्र नृत्य ही कला फक्त स्वत:पुरतीच मर्यादीत न ठेवता पुढे त्यांनी ‘मोर्यन डांस अकादमी’ची स्थापना केली. नंदनवन येथील नंदनवन हायस्कूलमध्ये सध्या चार बॅचेसमध्ये त्या नृत्याचे विद्यार्थी घडवित आहेत. त्यांच्या नृत्य वर्गात वय वर्षे तीन वर्षांपासूनची बालके तर महिलांचे स्वतंत्र वर्ग होतात. मोर्यन हा त्यांचा सात वर्षीय मुलगाही आपल्या आईच्या मार्गदर्शनात नृत्याचे धडे गिरवतोय. आपल्या मुलाच्या नावानेच त्यांनी ही अकादमी सुरु केली. आई आणि गुरुच्या मायेनेच त्या आपल्या समस्त विद्यार्थ्यांना नृत्य शिकवतात. त्यांच्यासाठी नृत्य ही कला नसून जणू साधनाच आहे. आयुष्याच्या संघर्षात नृत्य ही कला ‘संजीवनी’ ठरते असे त्या सांगतात. नृत्याच्या लयीत दु:खाची भावना विरुन आत्म्यात जणू आनंदाचा,उत्साहाचा संचार होतो, नृत्य ही कला आहे, नशा आहे,साधना आहे,समर्पण आहे सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या जगण्यातला श्वास आहे,असे त्या सांगतात.
आपल्या नृत्य कलेच्या कारकीर्दीत त्यांना सुप्रसिद्ध नाट्य कलावंत व अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष् नरेश गडेकर व आसावरी तिडके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय आई नलिनी पाटणकर व जीवाभावाची मैत्रीण स्वाती अहिरराव यांची साथ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर लाभली. यंदा मोर्यन डांस अकादमीचे नृत्य शिकवणीचे वर्ग ७ एप्रिल पासून सुरु झाले असून दररोज सायंकाळी ४ ते ८ दरम्यान सुरु असतात. नंदनवन हायस्कूल,८४३-जे, न्यू नंदनवन, राजीव गांधी सभागृह जवळ, येथे तसेच ८२३७६६१६७० किंवा ९९२१६१३४०३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur