मतदारांनो निर्भयपणे मतदान करा- पोलिस आयुक्तांचे आवाहन

spot_img

नागपूर: मतदारांनो  निर्भयपणे मतदान करा. गरज पडल्यास पोलिसांसोबत संपर्क करा, आम्ही तुमच्या तात्काळ मदतीला येऊ, असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. शहरात सर्वत्र अभूतपूर्व बंदोबस्त लावण्यात आला आहे. स्थानिक पोलीस आणि होमगार्डस्च्या मदतीला केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेण्यात आले आहे.

देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातील लढतीवर देशाचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीला कसल्याही अनुचित प्रकाराने गालबोट लागू नये म्हणून पोलीस यंत्रणा रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. शहरातील सर्व संवेदशनशील  झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर सशस्त्र सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आली आहे. मतदानाच्या एक आठवड्यापूर्वीपासूनच पोलिसांनी शहरातील गुंडांना हाकलून लावण्यासाठी प्रतिबंधक कारवाई, तडिपारी, एमपीडीएसारखी कारवाई केली आहे. अवैध दारू विक्री करणारे आणि धूमधाम करणारे उपद्रवी समाजकंटक यांच्यावरही पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू ठेवली आहे. विनाकारण वाद घालून शांतता भंग करण्याची सवय जडलेल्या गुन्हेगारांवरही पोलिसांची खास नजर आहे. मात्र, अशाही स्थितीत कुणी मतदारांना आमिष किंवा धाक दाखवून मतदान प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकतात. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कुणी दडपण आणण्याचा प्रयत्न केल्यास कुणालाही न घाबरता पोलीस नियंत्रण कक्षात थेट संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. पोलीस तात्काळ तेथे पोहोचून योग्य ती उपाययोजना करेल. कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आश्वासनही पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी दिले आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़