
नागपूर: वाढता उन्हाळा,चढता पारा यासोबतच लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूकीचे तापमान देखील चांगलेच वाढले आहे. नागपूर मधून लोकसभेची निवडणूक लढवणारे बहूजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष् ॲड.सुरेश माने यांच्या प्रचाराने देखील चांगलाच वेग घेतला आहे. त्यांनी आपली पहीली पत्र परिषद संपूर्णत: भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीवर फोकस केली होती, आपली दूसरी पत्र परिषद त्यांनी कॉंग्रेसच्या ‘इतिहासासाठी’राखीव ठेवली असून तिसऱ्या पत्र परिषदेत ते इतर पक्षाच्या कामगिरीवर संभाषण करणार असून चौथ्या पत्र परिषदेत ते नागपूरमधून का निवडणूक लढवित आहे, नागपूर मतदार संघासाठी त्यांचे काय व्हीजन आहे याबाबत संवाद साधणार आहे. ’सत्ताधीश’ न्यूज पोर्टल ने त्यांच्याशी खास साधलेला हा संवाद.
प्रश्न: नागपूरमधूनच उमेदवारी का?
उत्तर: भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत कारभाराच्या विरोधात जनतेमध्ये नैराश्य आहे,राग आहे. हा राग तेवढ्याच ताकदीने व्यक्त झाला पाहीजे. हा विरोध करण्यास काँग्रेस पक्ष् सक्षम नाही.शरद पवार यांनी तर निवडणूकीतूनच माघार घेतली. विखे पाटलांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश घेतला यावरुन हा संदेश गेला कॉंग्रेस मजबूतपणे निवडणूक लढवू शकत नाही. मोदींच्या मंत्री मंडळातील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी नागपूरातूनच लढतात आहे त्यामुळे त्यांची पोल खोलणे हा पहीला उद्देश्य आहे. दूसरे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयं संघाचे हेड क्वार्टर नागपूरातच आहे.संविधान, लोकशाही मूल्ये, प्रजातंत्र व्यवस्था,घटनात्म संस्था, स्वातंत्र्य संघाला मान्य नाही, त्या संघ परिवाराला नागपूरातच विरोध करणे हे दूसरे कारण.तिसरे मुख्य कारण विदर्भाच्या आंदोलनाचे केंद्र हे नागपूर आहे. विदर्भ विरोधक नितीन गडकरी असो किंवा मुख्यमंत्री फडणवीस,त्यांना विरोध गोंदियामधून तर नाही करणार ना? याशिवाय नागपूरात दोन विचारधारा आहेत.दीक्षाभूमी आणि संघभूमी,यापैकी कोणती विचारधारा श्रेष्ठ आहे हे महाराष्ट्रात तीव्र होणे गरजेचे आहे.याशिवाय सातत्यााने ‘विकासाचे’ क्रेडीट घेणारे गडकरी,त्यांच्या विकासाची पोलखोल नागपूरातूनच होऊ शकते.
प्रश्न: ‘कूंकू आणि नवरे’ अश्या राजकीय भाष्याविषयी काय बोलाल?
उत्तर: ज्यांच्यात सुसंस्कृतपणा नााही,ज्यांना सामाजिक,राजकीय जाणीव नाही,ज्यांच्याकडे जनतेला सांगण्यासाठी ठोस असे काहीच नसते अशीच माणसे असे राजकीय वक्तव्य करतात. अशी भाषा राजकारणात वापरु नये मी या मताचा आहे मात्र दूसरीकडे त्यांनी ज्या महिलेसाठी या शब्दांचा वापर केला त्यांनी पुन्हा आपले नामांकन भरताना १२ वी पास लिहले आहे. गेल्या .निवडणूकीत त्यांनी पदवीधर असल्याचा केला होता. जगातल्या नामांकित विद्यापीठांमध्ये भारताचे एकही विद्यापीठ नाही. अश्यावेळी एवढ्या महत्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी सक्षम माणसाकडे न देता कमी अनुभवी व्यक्तीकडे सोपवणे हा देखील मोदी सरकारचा आणखी एक कारनामाच म्हणावा लागेल. सध्या हे मंत्रालय सांभाळणारे प्रकाश जावडेकर हे माझे चांगले मित्र आहेत मात्र ते देखील कोणताही निर्णय न घेण्याची भूमिका वठवतात आहे.
प्रश्न: राजकारणाचा प्रवास या विषयी सांगा.
उत्तर: १९८२ साली विद्यार्थी दशेत बहूजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्याशी जुळलो मग महाराष्ट्र प्रदेशचा महासचिव झालो. २०१४ साली राष्ट्रीय महासचिव हे पद भूषवले. देशातील जवळपास पंधरा राज्याचा प्रभारी आहे. २०१५ साली बहूजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाची स्थापना केली. कुटुंबातील कोणीही राजकारणात नाही. आई-वडील निरक्ष् र होते. विद्यार्थी दशेपासून राजकारण हे ‘बांधिलकी’ म्हणून स्वीकारले ‘धंदा’ म्हणून नाही.
प्रश्न: देशद्रोही कलम याविषयीचे मत.
उत्तर: कलम १२४/ए हे इंग्रजांच्या काळापासून आतापर्यंत देशात लागू आहे. इंग्रजांनी ते कलम त्यांच्या सोयीसाठी बनवले होते. आजच्या काळात देशद्रोहीची संकल्पना ही बदलली आहे. इंग्रजांनी हे कलम टिळकां विरुद्ध वापरले होते.आता मात्र या कलमाचा दुरुपयोग होतो आहे. जेएनयूमध्ये याचा प्रत्यय आला आहे. राहूल गांधी यांनी या कलमाविषयी केलेल्या घोषणेचे मी स्वागत करतो मात्र ‘काँग्रेसला हे उशिरा सुचलेले शहाणपण’ असल्याचे मी मानतो.
प्रश्न:देशाच्या राजकारणात प्रभाव याबाबत काय सांगाल?
उत्तर: आमचा पक्षाच्या महाराष्ट्रात २८, गुजरातमध्ये ४ लोकसभेच्या जागा लढतोय. मी स्वत: देशपातळीवर संयोजक असल्यामुळे उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगढ इ.अश्या ४-५ राज्यात पक्षाचा प्रभाव आहे. आम्ही ‘नीती’चे पुरस्कर्ते आहोत ‘राजनीती’चे नाही. देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार राहता कामा नये. याचा अर्थ काँग्रेस पक्ष् यावा असा नाही. काँग्रेस पक्ष् आता विकल्प नाही होऊ शकत. घराणेशाहीला मतदान करणं लोकशाही विरुद्ध आहे. भारतीय लोकशाही विशिष्ट घराण्याची गुलाम होता कामा नये. दोन पिढ्या झाल्या की आरक्षण बंद करा अशी ओरड होत असते तशीच दोन पिढ्या झाल्या की घराणेशाही बंद करा अशी देखील मागणी होणार आहे. भाजपने नोकर् यांमध्ये जे आरक्षण दिले आहे ते तद्दन खोटे आहे कारण नोकऱ्याच नाहीत. घटनेजील आरक्षणाला धक्का न लावता भारतातील प्रत्येक गरीब कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी. आधी तर आमदार अणि खासदारांना पेंशन योजना बंद करा. सामान्य माणूय चाळीस वर्षांची नोकरी करुनही तेवढी पेंशन मिळवत नाही जी आमदार किवा खासदार फक्त एक दिवस आमदारकी किवा खासदारकी गाजवून आयुषभर घेतात. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला ‘शेतकरी यांची लवाद निर्मिती’ करण्यात यावी.
प्रश्न: मतदारांना काय आव्हान कराल?
उत्तर: खोट्या विकासाच्या आमिषाला भूलता कामा नये. जनतेच्या मूलभूत प्रश्नासाठी मतदार करावे. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता अनेक दशके भोगलीत. भाजपचे पाच वर्षे बघून घेतली. त्यामुळे यावेळी नव्या पक्षाला संधी द्या,सक्षम उमेदवारालाच मत द्या.
(मुलाखतकार- डॉ.ममता खांडेकर)
………………..



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur