
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील ५ वर्षे दररोज देशातील जनतेला ‘एप्रिल फूल’ बनवत आले आहेत. मात्र आज वर्धा येथे होणा-या मोदींच्या जाहीर सभेकडे पाठ फिरवून विदर्भातील जनतेने मोदींना एप्रिल फूल केले आहे. मोदींची वर्ध्यातील आजची सभा सुपर फ्लॉप ठरली आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या वर्धा येथील प्रचार सभेला निम्म्याहून अधिक मैदान रिकामे असल्यासंदर्भात प्रसारमाध्यमातील बातम्यांवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. महाराष्ट्रातील मोदींच्या पहिल्या प्रचार सभेला निम्मे मैदान मोकळे असल्याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोदींचे भाषण सुरू असताना हा व्हीडीओ घेण्यात आला असून,त्यामध्ये त्यांचा आवाजही स्पष्टपणे दिसून येतो आहे. त्यामुळे भाजप कितीही खुलासे करीत असले तरी पंतप्रधानांची पहिली जाहीर सभा फसली, हे सत्य त्यांना लपवता येणार नाही. निम्म्यापेक्षा अधिक मैदान रिकामे असताना मोदी आपल्या भाषणात मात्र मैदान खचाखच भरले आहे अशी जुमलेबाजी करत होते. दिवसा ढवळ्या ढळढळीत खोटे बोलणा-या व्यक्तीवर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न जनता विचारत आहे? वर्धा जिल्ह्यातील जनतेने मोदींच्या सभेकडे पाठ फिरवून विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, याची चुणूक दाखवल्याचे सचिन सावंत यांनी यावेळी सांगितले. त्यातही मोदीजी वर्धा येथे आलेच कशाला? त्यांनी पाच वर्षीपूर्वी वर्धा येथे केलेल्या भाषणाची टेप ऐकवली असती तरी चालले असते. मोदींचे आजचे भाषण ऐकून उपस्थितांना मोदीजी सत्ता पक्षात आहेत की विरोधी पक्षात असा प्रश्न पडला असेल.
विकास झाला गहाळ, सैन्याची केली ढाल
मग आता तोच कांगावा, भाषण तसेच रटाळ!
विरोधकांवर पुन्हा तोंडसुख, पुन्हा हिंदूत्वाचा नारा
दाखवायला नाही तोंड, उत्तरांऐवजी प्रश्नांचा मारा!
गेल्या पाच वर्षात मोदीजी तुम्ही काय केले? ते जनतेला सांगा असे सावंत म्हणाले.
मागील ५ वर्षे पंतप्रधानांनी केवळ आश्वसने आणि पोकळ घोषणा केल्या. त्यामुळे आता जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नसून,वर्धेतील निम्म्या रिकाम्या मैदानातून हे स्पष्ट झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असताना गेल्या ५ वर्षात पंतप्रधानांना एकदाही त्यांच्या पाठीवर हात ठेवून धीर देण्यास वेळ मिळाला नाही. उलटपक्षी शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची खोटी घोषणा करून त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले. त्यामुळे यावेळी नरेंद्र मोदींनी कितीही आव आणला तरी त्यांना शेतकरी थारा देणार नाहीत, असेही सचिन सावंत यांनी सांगितले.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur