
भट सभागृह नावाचे ‘राजमहाल’ हौशी रंगकर्मींसाठी ’मृगजळ’
अनिल चनाखेकर
(ज्येष्ठ रंगकर्मी)
महाराष्ट्राच्या उपराजधानीत देखण्या उदघाटन सोहळ्यानंतर सुरु झालेल्या रेशिम बाग येथील सुरेश भट सभागृहाला आता दोन वर्षे पूर्ण होत आली पण हौशी रंगकर्मींसाठी ते ‘मृगजळच’ ठरले आहे. नागपूर महानगरपालिका भट सभागृह हौशी रंगकर्मींसाठी अवघ्या पाच हजार रुपयांत उपलब्ध करुन देते मात्र यासाठी दोन अटीही लादण्यात आल्या. हौशी रंगभूमीला आपल्या प्रयोगासाठी तिकीट लावता येणार नाही तसेच देणगीही स्वीकारता येणार नाही! प्रयोग करण्यासाठी लागणारे नेपथ्य, प्रकाश योजना, तालमी यासाठी किमान पंधरा ते विस हजार रुपये खर्च येतो.हाैशी रंगकर्मीनी एका प्रयोगासाठी पंचविस हजार रुपये कसे खर्च करायचे?अशक्य कोटीतील ही बाब आहे.
हौशी रंगकर्मींच्या नाटकांना १००-१५० च्या वर प्रेक्षक कधीही येत नाहीत. ऐकांक,दिर्घांक किंवा दोन अंकी नाटक सादर करणे या रंगसभागृहात हौशी रंगकर्मींना अशक्य आहे. महाराष्ट्र पातळीवरच्या महानगरपालिकेच्या ऐकांकिका स्पर्धांना दोन हजारांच्या आसनावर केवळ पंचवीस-तीस प्रेक्षक उपस्थित होते.आलिशान सभागृहातील अखिल भारतीय नाट्य संमेलनात नि:शुल्क असलेल्या कार्यक्रमात मोजके आणि तुरळक प्रेक्षकांनीच उपस्थिती लावली. व्यवसायिक ऑकेस्ट्रा व ‘सही रे सही’ सारखं नाटकही हाऊसफूल हाेवू शकलं नाही. परिसंवादाला असणारी उपस्थिती ‘लज्जास्पद’होती पण यात आयोजकांचा दोष नाही. ‘पुलापलीकडे‘ असलेले अजस्त्र सभागृह प्रेक्षकांना आकर्षित करु शकले नाही हे सत्य आहे. अवघ्या ५०००/ रु.मिळणारे सभागृह शाळा-महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनांसाठी उपयोगी ठरु लागले आहेत! वसंतराव देशपांडे सभागृहाचे भाडे रु. ५०००/रु. होताच तेथेही अशाच प्रकारची स्नेह संमेलने होत होती.कालांतराने शासनाला त्याचे भाडे परत २५०००/रु. करावे लागले,तोच न्याय आज ना उद्या सुरेश भट सभागृहालाही लागणार आहे.
हे देखणं,लखलखीत रंगसभागृह हौशी रंगकर्मींच्या कोणत्याही प्रकारे उपयुक्त ठरणार नाही हे काळाने सिद्ध केले आहे. हौशी रंगकर्मींना अजस्त्र, राजमहाल सदृश्य रंगमंदिर नकोय तर १५० ते २०० प्रेक्षक मावतील अशा ‘अर्ध व्यावसायिक’ रंगमंदिराची गरज आहे. शासन व महानगर पालिकेने असे सभागृह उभारले नाही तर सार्वजनिक संस्थांना पुढकार घेऊन असे सभागृह उभारणे क्रमप्राप्त आहे ,तीच काळाची गरज आहे.
भट सभागृह म्हणजे उंचच उंच नजर अवकाशापर्यंत पोहाचेल अशा उत्तुंग उंचीचे रंगसभागृह. सुबक, आरामदेही अासंनाच्या रांगांच्या रांगा.वर नजर जाताच विलोभनीय बाल्कनी.प्रत्येक भिंत नवशिखांत नटलेली. रंगकर्मींना प्राणाहून प्रिय असलेला रंगमंच पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेला. नजरेच्या टप्प्यात न येणारा. नेपथ्यकाराने सारे विश्व साकारले तरी.. दशांगुळे उरणारा. भव्य रंगमंच. सभागृहात प्रवेश करण्यापूर्वीचे दालन तर ‘अवाढव्य’या शब्दालाही लाजवणारा,देखणा,परिपूर्ण!आपण नागपूरातील रंगसभागृहात उभे आहोत यावर विश्वासच बसणे अशक्यप्राय. राजस्थान किंवा म्हैसूरच्या एखाद्या राजमहालातील प्रसादात उभे आहोत असा आभास देणारे भट रंगसभागृह. नागपूरच्या लाडक्या नायकांनी जणू ‘मयसभाच’ उभी केली. नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर नगरीवर असलेल्या अस्सल,निरलस प्रेमाची साक्ष् म्हणजे कविवर्य सुरेश भट सभागृह. आजपर्यंत अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी सरकारी जमिनी नाममात्र दरात बळकावून सात पिढ्यांचं कल्याण करणारा शिक्षणाचा धंदा सुरु केला. आमच्या एका माजी ‘मंत्र्याने’ मुंबईत स्वत:च्या नावाने मोठे क्रिकेट स्डेडियम उभारले. सौभाग्यवतीच्या नावाने नागपूरात सार्वजनिक जमीनीवर मंगल कार्यालय उभारले पण महाराष्ट्राचा खजिना सांभाळणाऱ्या या महापुरुषांनीच नव्हे तर मागच्या पिढीतील काेणत्याही नेत्याने नागपूरसाठी काहीही केले नाही! पुण्याशी तर आपण विनाकारण तुलना करतो. नागपूर महापालिकेने २०१७ साली रंगसभागृहाचे एक स्वप्न नागपूरकरांना बहाल केले.
पण मित्रहो लक्षात घ्या.आजपासून ५० वर्षांपूर्वी पुणे महापालिकेने १९६७ साली पुण्याच्या विस्तीर्ण बगिच्यात ‘बाल गंधर्व’ रंगमंदिर उभारले.हे कार्य त्यांनी ५० वर्षांपूर्वीच केले! ना.सी.फडके व आचार्य अत्रे यांच्यासारख्या विख्यात सारस्वतांच्या हस्ते बालगंधर्व नाट्यमंदिराचे उदघाटन झाले. मात्र नागपूरच्या सुरेश भट सभागृहाचे उदघाटन करताना एकही नागपूरकर सारस्वत सापडू नये?किंबहूना महाराष्ट्रातील एकही रंगकर्मीची आठवण येऊ नये? कार्यक्रम आयोजन समितीने याचे भानच राखले नाही.उदघाटनाला उपस्थित होते महामहिम राष्ट्रपती, केंद्रिय मंत्री, मुख्यमंत्री ! कार्यक्रम देखणा व नेटका होता मात्र…चांदीच्या पाटावर आणि सोन्याच्या ताटात कलाकृतींचे रसग्रहण करण्यासाठी हे सभागृह स्थापन झाले आहे का?
खरंतर आम्हा रसिकांना ‘केळीच्या’ पानांवर जेवणाची सवय. पण ६० ते ७० च्या दशकांत केळीचे पान सुग्रास भोजनांनी आटोकांट भरलेले असायचे. नानासाहेब फाटक, डॉ.घाणेकर,पणशीकर, विजयाबाई, डॉ.लागू यांच्या भारावून टाकणाऱ्या अभिनयाने नागपूरची पिढी स्तिमीत झाली होती. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांची लयलृट होती. दारव्हेकर मास्तरांनी नागपूरकरांना नाटक बघणे म्हणजे काय असतं ते शिकवलं. मास्तरांनंतरही देबॉशिष रॉय, रमेश अंभईकर,नागेश देशमुख यांचे नाट्यमहोत्सवी नाटकही हाऊसफूल असत. तो काळ म्हणजे नागपूरच्या सांस्कृतिक जगताचा सुवर्णकाळ. सभागृहाला महत्व असतं पण त्यापेकक्षाही अधिक महत्व आजूबाजूच्या परिसरालाही असतं. भट सभागृह ‘पूला पलीकडे’ बांधण्याचा ‘महाली स्पिरीट’चा अट्टहास का? पूर्व नागपूरच्या लोकांनी पश्चिम नागपूरात येऊन कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा हे महाली स्पिरीटला पटले नसावे ! परिणामी भव्य व प्रासादयुक्त बांधलेल्या भट सभागृहात कलावंत व रसिकांचा राबता निर्माण करणे अशक्यप्राय गोष्ट मी मानतो. ऐवढ्या सुसज्ज सभागृहाला कार्यक्रम नसताना टाळे लागणे अपरिहार्य आहे.इतकं चकचकीत अणि भव्य सभागृह रसिकांसाठी खुले ठेवणे आयोजकांना अशक्यप्राय अहे. सभागृहाच्या आवारातच चार-पाच लहान सभागृह निर्माण झाले असते तर वाड्मयीन वातावरण निर्माण झाले असते. प्रचंड सभागृहाला कितीही कमी दर लावले तरी नागपूरच्या हौशी रंगभूमीला ‘पुर्नजिवित’ करणे त्या सभागृहाला अशक्य अाहे.
व्यावसायिक नाटके नागपूरात येणे जवळपास बंद झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या व नि:शुल्क असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर व ‘समाजस्वाथ्य’ या दोन अप्रतिम नाटकांना अवघे दोन-अडीशसे प्रेक्षक हजेरी लावतात. उत्तोत्तम एकांकिका करणारे काही चमू नागपूरात सातत्याने कार्यरत आहेत पण रसिकांची संख्या शतकही गाठत नाही. शंभर कोटीहून अधिक खर्च केलेल्या सभागृहाला आपण नागपूरात चार ठिकाणी महानगर पालिकांच्या उद्यानात केवळ २०० ते २५० प्रेक्षक मावती्ल अशी रंगसभागृह उभे करु शकलो तर लहान -लहान सभागृहात नागपूरातील नाट्य,काव्य, पुस्तक प्रकाशन, व्याख्यान, नाट्य शिबिर अश्या विविध उपक्रमांसाठी उपयोग होवू शकेल.
पूर्व नागपूरावर निरतिशय प्रेम करणार् या आमच्या लाडकया नायकाला पश्चिमचे लोकंही भरभरुन प्रेम करतात हे नव्याने सांगण्याची गरज आहे का?तुम्ही संपूर्ण नागपूरचे प्रतिनिधीत्व करता आणि कायम करीत राहाल हे आमच्यासारख्या ‘पामरांनी’सांगण्याची गरज आहे का? आपण अखिल भारतीय नेतृत्व करता याचा संपूर्ण नागपूरकरांना सार्थ अभिमान आहे. प्रचंड,मोठे, ऐसपैस व अखिल भारतातही नसेल असे रंगसभागृह आपण उभारले याचा प्रत्येक रंगकर्मी व रसिकांना जाज्वल्य अभिमान आहे मात्र नागपूरातील अर्थकारण बदलत नाही तोपर्यं व्यायसायिक रंगभूमी नागपूरला अशक्यप्राय आहे. मुंबईच्या व्यायवसियिक नाटकांना आज नागपूरात कमी प्रतिसाद मिळतो. प्रचंड राजकीय पाठींबा असलेल्या एका संस्थेने मुंबईच्या नाटकांचा एक महोत्सव देशपांडे सभागृहात पुरस्कृत केला पण त्यालाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला हे सर्व रसिकांनी बघितलेले आहे. ‘अमर फोटो स्टूडिओ’सारखे एखादे नाटक रसिकांना तृप्त करु शकले बाकी सगळा आनंदी आंनद. हौशी रंगकर्मी ओढून-ताणून १००-२०० प्रेक्षक आणू शकतील पण त्यासाठी एवेढ्या अजस्त्र सभागृहात किती दिवस तो आपल्या कलाकृती सादर करु शकणार आहे?नागपूरच्या हौशी प्रायोगिक रंगकर्मीसाठी १५०-२०० प्रेक्षक मावतील ऐवढीच सभागृहे पुरेशी आहेे. पुढील ५० वर्षे नागपूरातील रंगकर्मींना हौशी प्रायोगिक रंगभूमीचीच उपासना करणे अपरिहार्य अाहे. अर्थात प्रायोगिक-हौशी रंगभूमी अस्सल सोन्यासारखी असते. व्यावसायिकतेप्रमाणे तांबा-पितळेची धातु कलाकृतीत मिसळण्याची त्यांना गरज नाही. नागपूरच्या तीन पिढ्यांची नाटके रसिकांनी अनुभवली आहेत.व्यावसायिक नाटकांपेेक्षाही उजवी ठरावित अशी नाटके अनेक स्पर्धांमधून नागपूरच्या रंगकर्मींनी सादर केली आहेत मात्र दूर्देव असे की त्याचा दूसरा प्रयोग त्यांना ‘अर्थबळा‘ अभावी सादर करता आले नाहीत किमान येणार्या पिढ्यांना या दूर्देवाचा सामना करावा लागु नये हीच रंगकर्मी म्हणून एक सदिच्छा. पूर्व-पश्चिम असा भेद न करता नागपूरच्या चारही विभागात छोटे-छोटे सभागृह निर्माण झाले तरच नागपूरच्या सांस्कृतिक उन्नतीचा तो परमोत्कर्ष ठरेल.
…………



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur