
नागपूर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांमध्ये विदर्भातील दोन जवानांचा समावेश आहे. संजय राजपूत (४९) व नितीन राठोड (४६) अशी त्यांची नावे आहेत.
पुलवामा येथे काल अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० वर जवान शहीद झाले आहेत. ही बातमी आल्याबरोबर कुटुंबांमध्ये व त्या गावामध्ये शोककळा पसरली आहे. यातील संजय भिकमसिंह राजपूत यांचे कुटुंब नागपुरातील सीआरपीएफ वसाहतीमध्ये राहत आहे. या हल्ल्याचे वृत्त कळल्यानंतर हे कुटुंब मलकापूरकडे रवाना झाले. संजय राजपूत हे मलकापूर येथील महाकालीनगरात रहिवासी आहेत. संजय राजपूत हे ११५ बटालियनधील जवान आहेत. संजय राजपूत यांना दोन मुले असून जय व शुभम अशी त्यांची नावे आहेत.
नितीन राठोड हे बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांगरा या गावचे आहेत. ते बटालियन ३ मध्ये दाखल झाले होते. नितीन राठोड २० वर्षांपूर्वी सीआरपीएफमध्ये दाखल झाले होते. त्यांची २० वर्षांची सेवा पूर्ण झाली होती. परंतु त्यांनी ही सेवा आणखी ५ वर्षांसाठी वाढवून घेतली होती. या दोन वीर जवानांना वीरत्व प्राप्त झाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur