सत्तेत आल्यास प्रत्येक गरिबाला रोजगार-मायावती

spot_img

नागपूर :उत्तरप्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य असून, लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्यामुळे देशाचा पंतप्रधान बनविण्यात उत्तरप्रदेशची नेहमीच मोलाची भूमिका असते. इतर राज्याचीही भूमिका असावी म्हणून प्रत्येक राज्याने चांगला निकाल देणे अपेक्षित आहे. साम, दाम, दंड, भेद यापासून सावध राहा.  बसपा सत्तेवर आल्यास प्रत्येक गरीब व्यक्तिला शासकीय व अशासकीय सवेत कायमस्वरुपी नोकरी देईल, असे जाहीर आश्वासन बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे दिले.

बसपाच्या विदर्भातील लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या. याप्रसंगी बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. सतिशचंद्र मिश्रा, आकाश आनंद, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी , बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे, संदीप ताजणे, कृष्णा बेले व नागपूर लोकसभेचे उमेदवार मोहम्मद जमाल प्रामुख्याने उपस्थित होते.
नाटके, जुमलेबाजी, चौकीदारी आता चालणार नाही अशी केंद्र शासनावर तोफ डागत मायावती म्हणाल्या, गरीब, बेरोजगार, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी, दलित, आदिवासी, मुस्लिम व इतर धार्मिक अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी अनेक घोषणा केल्या होत्या. परंतु, मोदींनी एकही घोषणा पूर्ण केली नाही. केवळ जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न केला. विनाकारण केलेला हजारो कोटी रुपयांचा खर्च गरीब व असहाय्य लोकांसाठी खर्च केला जाऊ शकला असता. केंद्र व राज्यात दोन्ही ठिकाणी शासन असूनही विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक समाजाचे भले शासनाने केलेच नाही. कॉंग्रेसच्या काळात बोफोर्स व भाजपच्या काळात राफेल घोटाळा झाला. देशाची सीमा सुरक्षित नाही. आतंकवादी हल्ल्यामध्ये सैनिक शहीद होत आहेत. केंद्र शासनाने विरोधी पक्षाचे तोंड बंद ठेवण्यासाठी विरोधकांना खोट्या प्रकरणात फसविले आणि फसविणे सुरूच आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत सत्ता चुकीच्या लोकांच्या हाती आहे. कॉंग्रेस व भाजप शासन पुंजीवादी व धन्नाशेठच्या मदतीने सत्तेवर येते. गरीब व सर्वसामान्य जनतेसाठी शासन काम करीत नसल्याचा आरोपही मायावती यांनी केला. अनेक पक्ष जाहिरनामे प्रसिद्ध करून प्रलोभन देतात. परंतु, प्रत्यक्ष कामे मात्र करीत नाहीत. बसपा जाहिरनामा प्रसिद्ध करीत नाही, तर कामे करण्यावर भर देते. कॉंग्रेसने ७२ हजार देण्याची घोषणा केली. पण, स्थायी मदत कोणालाही मिळणार नाही. ५ वर्षांनी सत्तापरिवर्तन होत असते. केंद्रात शासन आल्यास बसपा पैसा नव्हे तर, सरकारी, गैरसरकारी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देईल, असे आश्वासन मायावती यांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्षेच्या आधारावर संविधान बनविले. कायद्याच्या अधिकारासोबतच बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला. परंतु, तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ नये असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटते, असा घणाघाती आरोप मायावतींनी संघावर केला. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी चांदीचा हत्ती मायावतींना भेट दिला.

काँग्रेस व भाजपा दोघेही आरक्षण विरोधी आहेत. काँग्रेसनेच मंडल आयोग लागू होवू दिला नाही. बसपाच्या दबावामुळे व्ही.पी.सिंग सरकरने मंडल आयोग लागू केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न दिले. तेव्हा जातीयवादी मानसिकतेच्या भाजपने व्ही.पी.सिंग सरकारचे बाहेरून असलेले समर्थन काढले. काँग्रेस आणि भाजप दोघेही सारखेच आहेत. ते आतुन मिळालेले आहेत. जातीवादी मानिसकतेमुळे त्यांनी आरक्षणाचा कोटा कधीच भरला नाही. पदोन्नतीचे आरक्षण प्रभावहीन बनवले. खासगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मागासवर्गीयांना मिळू शकला नाही, अशी टीकाही मायावती यांनी केली.
देशात भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. संरक्षण खातेही यातून सुटलेले नाही. काँग्रेसने केलेले बोफोर्स आणि भाजपचे राफेल याचे उदाहरण आहे. आपले अपयश लपवण्यासाठी काँग्रेसप्रमाणेच भाजपही विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या प्रकरणात फसवित आहे. यासाठी सीबीआय, ईडी व आयटीचा वापर केला जात असल्याची खरमरीत टीकाही मायावती यांनी केली.

मोदी हे खोटारडे-अबु आझमी

पंतप्रधान मोदी दररोज खोटे बोलत आहेत. केंद्र शासन संविधानाला महत्त्व देत नाही. त्यामुळे देशाच्या संविधानाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे असे आवाहन करीत देश व राज्याच्या सत्तेत निश्चितच बसपा बसेल असा विश्वास समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु आझमी यांनी बोलून दाखविला.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़