लग्नासाठी तरुणीचे अपहरण करून मध्यप्रदेशात विक्री

spot_img

लग्नासाठी तरुणीचे अपहरण करून मध्यप्रदेशात विक्री

नागपूर. शहरातील एका 22 वर्षीय तरुणीला गुंगीचे पदार्थ नाकाला लावून बेशुद्ध केल्यानंतर तिचे अपहरण करून जबरदस्तीने तिचा विवाह मध्यप्रदेशातील शहाजानपुऱ्यात लावण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारला उघडकीस आली. विशेष म्हणजे, शेजारी राहणाऱ्या चौघांनी तरुणीची 75 हजारांचा विक्री केल्याची बाब पतीने पीडितेला सांगितली. सात महिन्यानंतर पतीसोबत पीडितेने येताच आरोपींविरुद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणी 3 महिलांसह चार जणांवर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
22 वर्षीय तरुणीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आशा रोकडे, उषा रोकडे, चंदा गजभिये आणि त्यांचा एका साथीदार हे सर्व गिट्टीखदानमधील जगदीशनगरात तरुणीच्या शेजारी राहतात. त्यामुळे तरुणीसोबत त्यांची बोलचाल होती. तरुणीचे पालक तिच्या लग्नासाठी वर शोधत होते. ते माहित असल्यामुळे तरुणीसोबत आशा, उषा आणि चंदाने सलगी वाढवली. तिला चांगला वर शोधून देतो असे सांगून 14 जुलै 2018 ला दुपारी बाराच्या सुमारास आपल्या घरी बोलविले. तेथे बोलता बोलता आरोपीतांनी तिच्या नाकावर रुमाल ठेवला. ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीतांनी तिला तशाच अवस्थेत मध्यप्रदेशातील शहजानपुऱ्यात नेले.
तेथील अशोक कैलास सिसोदिया याला 75 हजारांत तरुणीला विकले. त्यानंतर सिसोदियासोबत तिचे लग्न लावून दिले. यावेळी आरोपी महिलांनी सिसोदियाला आपली ओळख तरुणीची आई तसेच मावशीच्या रुपात दिली. दरम्यान, तरुणीचा संसार सुरळीत सुरू झाला. आता सात महिन्यानंतर तरुणी आणि तिचा पती सिसोदिया कौटुंबिक गप्पा करीत असताना त्यांच्यात लग्नापूर्वीच्या गोष्टी निघाल्या. यावेळी सिसोदियाने तुझी मला विक्री करताना तुझ्या आई आणि मावशीने 75 हजार रुपये माझ्याकडून घेतल्याचे तरुणीला सांगितले.
..
– पतीने दिला आधार
या प्रकरणाचा उलगडा झाला. आशा, उषा आणि चंदा पैकी कुणीच नातेवाईक नसल्याचे तरुणीने पतीला सांगितले. पतीने तिला आधार देत आरोपींना शिक्षा देण्याचा विश्वास दाखविला. त्यानंतर सिसोदिया आणि त्याची पत्नी (तक्रारदार तरुणी) शहजानपूरच्या पोलीस ठाण्यात तेले. त्यांनी सर्व माहिती तेथील पोलिसांना दिली. शहजानपूर पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांना कळविले. त्यानंतर सिसोदिया दांम्पत्य शुक्रवारी नागपुरात पोहचले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी आशा, उषा, चंदा आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध अपहरण करून तरुणीची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
..
-आरोपीतांचा शोध सुरु
आरोपी महिला सध्या परप्रांतात गेल्या आहेत. त्यांनी पुन्हा कुण्या दुसऱ्या तरुणीला अशाच प्रकारे तिकडे नेले असावे, असा संशय आहे. एका विशिष्ट समाजातील रितीरिवाजाप्रमाणे लग्नाच्या बदल्यात वधूच्या माहेरच्यांना वर पक्षाकडून रोख स्वरूपात रक्कम दिली जाते. आरोपी महिला आणि त्यांचे साथीदार गरजू तरुणींना भूलथाप देऊन बाहेर प्रांतात नेत असावे आणि त्यांची तिकडे विक्री करीत असावेत, असा संशय आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
————–

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़