नाना पटोले यांना नाही मिळणार सीसीटीव्ही फुटेज-न्यायालयाचा दणका

spot_img

 

नागपूर:  काँग्रेसचे लोकसभा मतदार संघातील उमेदवार नाना पटोले यांना ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुम्समधील सीसीटीव्ही फुटेज मिळणार नाही असा निर्णय  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. वर्तमानस्थितीत यासंदर्भातील वादात शिरता येणार नसल्याचे सांगून पटोले यांना दिलासा देण्यास नकार दिला. परंतु, हा मुद्दा योग्य वेळी व योग्य प्रकरणात मांडण्याचा मार्ग मोकळा ठेवण्यात आला . तसेच, पटोले यांना याविषयी कायद्यात उपलब्ध अन्य मार्गाचा अवलंब करता येईल असेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले.
नागपूर शहर काँग्रेस समिती व नाना पटोले यांनी रिट याचिका दाखल करून नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले होते व विविध मागण्या केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांनी निर्णय दिला. निवडणुकीत अडथळा निर्माण होईल असा कोणताही आदेश आपण देणार नाही आणि निवडणूक सुरक्षित, पारदर्शी व जबाबदार पद्धतीने झाली पाहिजे एवढाचा आपला उद्देश आहे असे न्यायालयाने निर्णयाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करून पुढील वाटचाल केली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा एकेक मुद्दा ऐकून व त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे उत्तर जाणून घेऊन आवश्यक ते निर्देश दिलेत.
नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी ४१८४ ईव्हीएम वापरल्या जाणार आहेत. या ईव्हीएम सहा स्ट्राँग रुम्समध्ये ठेवण्यात आल्या आहेत. २५ मार्च ते २८ मार्चपर्यंत ईव्हीएमची प्रथमस्तरीय तपासणी संपल्यानंतर व द्वितीयस्तरीय तपासणी सुरू होताना दक्षिण नागपूर व मध्य नागपूर विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रुम्समधील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे निवडणुकीच्या नि:पक्षतेवर व पारदर्शकतेवर पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यासंदर्भातील संशय दूर होण्यासाठी सहाही ईव्हीएम स्ट्राँग रुम्समधील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी पटोले यांनी केली होती. हे आरोप निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी अमान्य केले. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते. संबंधित स्ट्राँग रुम्समधील सर्व वेळेतील व्हिडिओ रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. परंतु, ते पटोले यांना देता येणार नाही असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणामध्ये सदर वादात शिरण्यास नकार देऊन वरीलप्रमाणे आदेश दिला.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़