
कळमेश्वर/कन्हान : काँग्रेसने सत्ता आल्यानंतर देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे जाहीरनाम्यात सांगितले आहे. त्यामुळे देशद्रोह्यांचे संरक्षण करणारे की त्यांना फासावर लटकविणारे सरकार हवे आहे, हे ठरविण्याची वेळ आली आहे. देशद्रोह्यांना कुरवाळण्याची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून रोखा,असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
ठाकरे म्हणाले, ‘जेएनयु’मध्ये देशविरोधी नारे लावणाऱ्यांना गोंजरण्याची भाषा काँग्रेस करीत आहे. अशा लोकांसाठी कलम १२४ (अ) रद्द करण्यात येत असेल तर देशाच्या गद्दाराचे हित जोपासणाऱ्यांना धडा शिकविलाच पाहिजे. गद्दारांना धडा शिकविण्याचा रामटेकचा इतिहास आहे. मधल्या काळात मी शेतकऱ्यांच्या रान उठविले होेते. सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याची आणि शेतमालाला रास्त हमी भाव देण्याची ग्वाही दिल्यानेच भाजप-सेनेची युती झाली. देशात पुन्हा मोदी सरकार आल्यानंतर तालुकास्तरावर शेतकरी मदत केंद्र उभे केले जातील. शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची उत्तरे या केंद्रात असतील.
विरोधकांनी अजूनही पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. सत्तेसाठी संगीत खुर्ची सुरु आहे. त्यामुळे ज्यांचा नेताच स्पष्ट नाही अशा लोकांच्या हातात सत्ता देऊन देश असुरक्षित करायचा का, असा सवालही त्यांनी केला. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला देशाच्या सैनिकांनी सडेतोड उत्तर दिले. याचे पुरावे विरोधक मागत आहे. यातही शरद पवार यांनी राजकारण केल्याची टीका ठाकरे यांनी केली.
विदर्भात शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. संत्रा उत्पादक त्रस्त आहे. काँग्रेसच्या सरकारमुळे शेतकऱ्यांची ही अवस्था झाली आहे. युती सरकारने कर्ज माफी दिली. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस धोरणही आखत आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
कृपाल तुमाने यांनी रामटेक मतदार संघात झालेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडत केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले. कन्हान येथील सभेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष अॅड. आशिष जयस्वाल, नगराध्यक्ष शंकर चहांदे, सतीश हरडे उपस्थित होते.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur