
ज्येष्ठांचा खुजेपणा
ल.त्र्यं.जोशी
(ज्येष्ठ पत्रकार नागपूर)
९४२२८६५९३५
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी व सुमित्रा महाजन यांच्या योगदानाविषयी पूर्ण आदर ठेवूनही नाईलाजास्तव म्हणावेसे वाटते की, त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या शेवटी शेवटी आपल्या खुजेपणाचेच दर्शन घडविले आहे. त्या तिघांचेही भाजपाच्या विकासातील योगदान आभाळाएवढे आहे याबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्षवाढीसाठी उपसलेल्या कष्टांचीही सर्वांना योग्य जाणीव आहे. पण पक्षात आणि सरकारात प्रतिष्ठेची अनेक पदे उपभोगल्यानंतरही त्यांनी आपल्या पोटातील मळमळ निर्वाणीच्या क्षणी कां ओकावी, हे केवळ अनाकलनीय आहे. अर्थात त्यांनी दिलेल्या योगदानाचे, केलेल्या परिश्रमांचे महत्व यत्किंचितही कमी न करता असेही म्हणावेसे वाटते की, माणसाला शेवटी केव्हा तरी थांबावेच लागते. थांबण्याची वेळही त्यानेच निश्चित करायला हवी. कुणी थांबा म्हणण्याची वाट पाहता कामा नये. थांबल्याने त्यांचे महत्व कमी होत नाही. उलट वाढते. हे या महाभागांना कळू नये, कळत असेल तर वळू नये ही त्यांच्या जीवनातील फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. विशेषत: कोणत्याही कारणाने कां होईना पण असा मनुष्य थांबला तर तो किती उंची गाठू शकतो हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या उदाहरणावरुन स्पष्ट झाले असतांनाही त्यांच्या निकट उभी हयात घालविणाºया या मंडळींना ते कळू नये यापरते दुर्दैव ते कोणते.
राजकारणात कुणाचे, केव्हा, काय होईल याचा मुळीच भरवसा नसतो. म्हणून सर्वोच्च पदाची आकांक्षाच बाळगू नये असे कुणीही म्हणणार नाही. त्यातही पक्ष जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर असतो तेव्हा तशी आकांक्षा मनात निर्माण होणे चूक नाही आणि पापही नाही. पण अपेक्षित पद मिळाले नाही म्हणजे सगळे संपले असेही होत नाही. शेवटी ते कां मिळाले नाही किंवा मिळत नाही हे समजून घेण्याची व आपला समंजसपणा उदात्तपणे प्रकट करण्याची गरज असते. ते भान या तिघांनीही राखले नाही असे अतिशय खेदपूर्वक नमूद करावे लागत आहे. विशेषत: महाभारतीय युध्द सुरु असतांना असा अवसानघात करण्याचा प्रयत्न करणे हा मातृसंस्थेवरील सर्वात मोठा अन्याय ठरतो.
तसे पाहिले तर या तिघांनाही पक्षाने काय देण्याचे बाकी ठेवले होते? उपपंतप्रधानपद, पक्षाध्यक्षपद, लोकसभेचे अध्यक्षपद अशी घटनात्मक पदे बहाल केली. पक्षात त्यांना वेळोवेळी सन्मानाने वागवलेही. तरी पक्षाने केलेल्या नियमानुसार त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळत नसेल तर त्यांनी इतके उद्विग्न व्हावे? तेही आठ आठ वेळा निवडणूक लढविण्याची संधी मिळून? एकवेळ उद्विग्न होणेही समजून घेता येईल पण त्याचे प्रदर्शन मांडणे त्यांच्या कीर्तीला निश्चितच शोभणारे नाही. नव्हे तो त्यांच्या उज्वल कारकीर्दीवरील काळा डाग ठरतो. खरे तर पक्षाने ७५ वर्षाचा नियम केला असतांना त्यांनी सर्वप्रथम पुढे येऊन त्याबद्दल समाधान व्यक्त करणे, पक्षाचे आभार मानणे उचित ठरले असते. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदापेक्षाही मोठा मान मिळाला असता. पण दुर्दैवाने ते त्यांच्या नशिबात नव्हते.
या निवडणुकीत पक्षाच्या दोन महिला नेत्यांनी प्रकट केलेल्या उमदेपणाच्या पार्श्वभूमीवर तर हे महाभाग केविलवाणेच ठरतात. जळगाव मतदारसंघातून प्रथम स्मिता वाघ यांना तिकिट देण्यात आले होते. पण त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटताच पक्षाने दुसरा उमेदवार दिला. बंगलोर दक्षिण मतदारसंघातही दिवंगत केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या पत्नी सुहासिनी यांना तिकिट देण्याचे जवळपास ठरले होते. पण तेथे एका तरुण कार्यकर्त्याला तिकिट देण्याचा निर्णय झाला. त्या दोघींनी काय करावे? कोणतीही खळखळ न करता त्या दिलेल्या उमेदवाराच्या प्रचाराला लागल्या. जी बाब स्मिता वाघ किंवा श्रीमती सुहासिनी यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना सुचू शकते ती या महाभागांना समजू नये काय? या तिघांनीही आपापल्या भावना प्रकट करणारी निवेदने प्रसिध्द केली. सकृतदर्शनी ती निरुपद्रवीही वाटतात पण त्यात भरलेला कडवटपणाही लपून राहत नाही. खरे तर त्यांना पक्षाने आतापर्यंत दिलेल्या सन्मानाबद्दल मोठ्या मनाने कृतज्ञता प्रकट करायला हवी होती. तसे झाले असते तर त्यांची उंची शतपटींनी वाढली असती. कार्यकर्त्यांच्या मनात परमादर निर्माण झाला असता. ती संधी त्यांना पकडता येऊ नये हे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठे अपयश म्हणावे लागेल.
हा मजकूर लिहितांना त्या तिन्ही महाभागांचा माझ्याकडून अधिक्षेप होत आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. पण मी मांडलेला विषय कुणी तरी मांडणे आवश्यक आहे असे वाटल्यावरुन हे कदाचित दुस्साहस मी करीत आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेछा देतो.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur