कामांचा पाठपुरावा करा, समस्या तातडीने सोडवा : महापौर नंदा जिचकार

spot_img

लक्ष्मी नगर झोनमध्ये ‘महापौर आपल्या दारी’

नागपूर,ता. ५ : लक्ष्मीनगर झोन हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील भाग आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी सदैव पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. झोनमधील नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक कामे करण्यासाठी निधीची कमतरता नाही. अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून ती कामे करून घ्यावी आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्या, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (ता. ५) महापौर नंदा जिचकार यांनी लक्ष्मीनगरमधील प्रभाग १६ व ३८ चा दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेवक लखन येरवार, किशोर वानखेडे, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व संबंधित विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी लक्ष्मी नगर झोनमधील प्रभाग १६ व ३८ अंतर्गत तकिया, इंडियन जिमखाना मैदान, काँग्रेस नगर उद्यान जवळील परिसर, खामला येथील संचयनी कॉम्प्लेक्स, हिंगणा मार्गावरील टाकळी सिम, यशोदा नगर, आनंद नगर आदी ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी मनपाच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयातील विविध विभागांच्या कामाची माहिती जाणून घेतली. झोनमध्ये कोणत्याही समस्यांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये कामाप्रती शिस्त निर्माण होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य देउन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने जबाबदारीने काम करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.

तकिया येथील इंडियन जिमखानाच्या मैदानात मुख्य मार्गालगत निर्माणधीन इमारत आहे. इमारतीबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने इमारतीचे बांधकाम अनेक वर्षापासून बंद आहे. मात्र अर्धवट बांधकामामुळे इमारतीच्या खालच्या भागात घाण पाणी जमा आहे. याशिवाय येथे कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे, डासांच्या प्रकोपाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याची तक्रार नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इमारतीखालील खड्ड्यात जमा असलेले पाणी अत्यंत घातक आहे. खामला येथील संचयनी कॉम्प्लेक्स संदर्भातही अशीच परिस्थिती महापौरांना निदर्शनास आणून देण्यात आली. खामला मार्गालगत असलेल्या निर्माणाधीन बंद इमारतीचे प्रकरण न्यायालयात असल्याने अनेक वर्षांपासून इमारतीच्या तळभागात पाणी साचले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. याबाबत ठोस कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी यावेळी केली. यासंदर्भातही योग्य निर्णय घेण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक बोलावून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे महापौर नंदा जिचकार यांनी सांगतिले.

काँग्रेस नगर उद्यानाजवळ रहिवासी क्षेत्रामध्ये असलेल्या मोकळ्या भुखंडावर कचरा व इतर घाण करण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास होतो. या जागेवर रहिवासी क्षेत्रातील नागरिकांनी पार्किंगसाठी उपयोग केल्यास येथील कचरा व घाणीची समस्या सुटेल, असे महापौर नंदा जिचकार यांनी नागरिकांना सांगितले.

हिंगणा मार्गावरील टाकळी सिम येथील स्वयंदीप विपश्यना केंद्रात भेट देऊन भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून महापौर नंदा जिचकार यांनी अभिवादन केले. यावेळी नागरिकांच्या वतीने महापौरांचे स्वागत करण्यात आले. स्वयंदीप विपश्यना केंद्राच्या विस्तीर्ण परिसराचा उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी येथे अभ्यासिका सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करणे, तसेच परिसरातील नागरिकांसाठी ग्रीन जिम लावण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले. टाकळी सिम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी मधील जागेतून रस्ता तयार करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आली. यासंदर्भात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कार्यवाही करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. यावेळी रेणुका उद्यानात लावलेल्या सेंद्रीय खत निर्मिती मशीनबाबत महापौर नंदा जिचकार यांनी माहिती जाणून घेतली. यशोदा नगर भाग एक येथील नाल्याच्या समस्येबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ११ फेब्रुवारीला होणाऱ्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी केले.

आनंद नगर परिसरात असलेल्या विहिरीवर जाळी बसविण्यात आली नसल्याने विहिरीचे पाणी खराब झाले आहे. या विहिरीची सफाई करून येथे तातडीने जाळी लावण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. परिसरातील गडर लाईन फुटल्याने घाण पाणी मोकळ्या जागेत जमा झाले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी गडर लाईनच्या दुरूस्तीबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उद्या बुधवारी (ता.६) लक्ष्मी नगर झोन अंतर्गत प्रभाग ३७ व ३८ येथे महापौर नंदा जिचकार यांचा दौरा होणार आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़