
नागपूर : स्टार बसच्या धंतोली येथील डेपोवर हल्ला करीत २० स्टार बसच्या काचा फोडण्यात आल्या. अचानक झालेल्या या हल्ल्याने येथील कर्मचाऱ्यांत धावपळ माजली. कर्मचाऱ्यांनाही मारहाण करून कारचेही नुकसान करण्यात आले. याप्रकरणी आर. के. बस ऑपरेशन्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला. या घटनेने डेपोत स्टार बसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
धंतोली येथील पटवर्धन मैदानावरील स्टार बस डेपोत रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आठ ते दहा अज्ञात लोकांनी अचानक हल्ला केला. चाकू, काठ्या घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी थेट बसच्या काचांवर काठा मारल्या. दरम्यान, यावेळी कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला असता त्यांनाही मारहाण केली. सुरक्षारक्षक रुपेश मुरकुटेलाही त्यांनी मारहाण केली. जवळच असलेल्या कार्यालयाची कारचेही नुकसान केले तसेच कार्यालतील फोनही फेकला. मारहाण केल्यामुळे कर्मचारी दहशतीने गप्प बसले. या हल्लेखोरांनी वीस स्टार बसच्या पुढील तसेच मागील काचा फोडल्या. त्यामुळे डेपो परिसरात काचांचा सडा पडला. या घटनेने हादरलेले कर्मचारी गिरीश बागडे यांनी धंतोली पोलिस स्टेशनला अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध तक्रार दाखल केली. आर. के. बस ऑपरेशन्स कंपनीने महापालिकेला या घटनेची माहिती दिली असून सुरक्षेअभावी कसे काम करणार? असा प्रश्न उपस्थित केला. आर. के. बस कंपनीही या घटनेने हादरली. सध्या केवळ ३०८ बसेस शहरात धावत आहे. त्यातील २० बसेसच्या काचा फुटल्याने आणखी बसच्या संख्येत घट झाली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur